संगीत स्वयंवर किंवा संगीत मानापमान नाटकांची पदं ऐकली कि २ नावं डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे गोविंदराव टेंबे आणि दुसरं म्हणजे भास्करबुवा बखले.
१७ ऑक्टोबर १८६९ साली सुरतजवळील कठोर गावी जन्म झाला आणि त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वत: शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.
शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखलेयांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.
दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे.
८ एप्रिल १९२२ ला भास्करबुवांचे दुःखद निधन झाले.
No comments:
Post a Comment