12 June, 2011

मराठी नाट्यसंगीत - केशवराव भोसले

केशवराव भोसले - मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक. आपल्या क्षेत्रात पुढे जाताना दुसऱ्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाणे, आपल्याकडे नसलेली कला दुसऱ्यांकडून विनयाने आत्मसात करणे आणि असलेली कला दुसऱ्यांना देणे असे हे व्यक्तिमत्व होते.

केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. उदा - संगीत सौभद्र मधील तुळशी वृंदावन, फिडेल वाद्याचा उपयोग इ.

केशवराव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. ह्या नाटकाची तिकिटे १०० रु. ह्या दराने विकली गेली होती (१०० रु. हि त्यावेळची फार मोठी किंमत होती).

मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार ह्या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. हा त्या नाटकाचा पहिला उघड्या रंगभूमीवरील प्रयोग होता.

संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. त्या आधी म्हणजे १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला होता. त्याप्रसंगी पंडित विष्णू दिगंबर पळूस्कर यांनी केशवरावांच्या गायन शैलीवर भाषण केले होते.

१९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह उघडले गेले.