12 November, 2011

दुखणे संगीत रंगभूमीचे!

नेहमीपेक्षा थोडी वेगळी अशी पोस्ट. रामदास कामत समर्पक लेख.

संगीत रंगभूमीची आजची दुरवस्था का झाली, याचा शोध घेऊ जाता अनेक कारणं सापडतात. त्यात संगीत नाटक लिहिणाऱ्या लेखकाची वानवा, गायनाचा अतिरेक, नव्या तरुण कलावंतांनी त्याकडे फिरवलेली पाठ, वगैरे वगैरे. परंतु नव्याने संगीत नाटकांचा विचार झाला तर संगीत रंगभूमीला पुनश्च वैभवाचे दिवस येणे अवघड नाही.

आज मराठी रंगभूमी सर्वार्गानी बहरलेली आहे असं म्हटलं जातं. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध रंगभूमींवर नवनवे प्रयोग चालू आहेत. परंतु संगीत रंगभूमीची मात्र पीछेहाट झालेली दिसते. किंबहुना, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. सध्या संगीत नाटकांचे तुरळक प्रयोग होत असतात आणि नाटय़संगीतही मागे पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे रसिकांच्या मनात- संगीत नाटके आणि नाटय़संगीत कालबाह्य़ झाले की कुवतबाह्य़ झाले आहे, असा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा ऊहापोह करण्याआधी संगीत नाटक आजच्या अवनत स्थितीला का व कसं पोहोचलं, याचा विचार करणे आवश्यक आहे.

१८८० साली अण्णासाहेब किलरेस्करांचं ‘संगीत शाकुंतल’ नाटक रंगभूमीवर आलं, तेव्हापासून खऱ्या अर्थाने संगीत नाटकांचा जमाना सुरू झाला. कीर्तनकार एखादं चरित्र/आख्यान सांगताना वीररसात्मक, करुणरसात्मक वगैरे विविध रसांची गाणी प्रसंगाला अनुरूप अशा रागांत गातो. ही गाणी साकी, दिंडी, कामदा, अंजनीगीत, कटाव वगैरे विविध वृत्तांत असतात. ‘शाकुंतल’ आणि त्यानंतर १९१० पर्यंत आलेल्या ‘सौभद्र’, ‘शापसंभ्रम’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’ वगैरे नाटकांत पुष्कळशी गाणी याच वृत्तात रचली गेली आहेत.

त्याकाळी संगीत नाटकं चालू असताना गद्य नाटकंही जोरात सुरू होती. असं असतानाही तेव्हा नाटकात गाण्यांचा समावेश करण्याची आवश्यकता त्यावेळच्या नाटकवाल्यांना भासली, याचं कारण चार-पाच तास गद्य नाटक पाहणं कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. म्हणून संगीत नाटकात पात्रांचं संभाषण, विचार, मनोगत वगैरे गाण्यांच्या रूपात व्यक्त केले गेले. ही गाणी केवळ मनोरंजनासाठीच होती असं नाही, तर कित्येक वेळा भावभावनांची उत्कटता व्यक्त करायला कधी कधी गद्य कमी पडते, तिथे संगीताचा वापर केल्यानं ती परिणामकारकरीत्या व्यक्त करता येते.

१९१० पर्यंत आलेल्या संगीत नाटकांमध्ये गद्य आणि संगीत समांतर रेषेत चालत होते. संगीत गद्याला पूरक होतं, त्यावर कुरघोडी करत नव्हतं. असा एक आक्षेप घेतला जातो की, जुन्या नाटकांत खूपच- म्हणजे दीडशे-दोनशे गाणी आहेत; म्हणजे फारच झालं! पूर्वीच्या काळी पाच-साडेपाच तास चालणारी, विस्तारानं लिहिलेली नाटकं होती. नाटकांतले बरेचसे संवाद, विचार, भावभावना संगीताच्या रूपात आल्याकारणानं गाण्यांची संख्याही जास्त होती. तरीही त्यांत गायन मर्यादित स्वरूपाचं होतं आणि ते संभाषण, विचार किंवा भावभावना व्यक्त करण्यापुरतंच होतं.

१९११ ते १९३३ हा काळ नाटय़संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशांसारख्या असामान्य गायकांनी दिलेल्या अभिजात संगीतातील उत्तमोत्तम चिजांवर आणि चालींवर गाणी बांधली गेली. ही नाटकं रंगभूमीवर येईपर्यंत शास्त्रीय संगीत फक्त विशिष्ट ठिकाणी थोडय़ाच लोकांना ऐकायला मिळत असे. तिथं सामान्यजनांना शिरकाव नव्हता. परंतु संगीत नाटकांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत नाटय़संगीताच्या रूपात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सामान्यजनांपर्यंत पोहचलं. मराठी प्रेक्षक नाटय़संगीतावर लुब्ध झाले आणि संगीत नाटकांवर अक्षरश: तुटून पडले. केशवराव भोसले, बालगंधर्व, मा. दीनानाथ, बापूसाहेब पेंढारकर असे मातब्बर गायक नट रंगभूमीला लाभले आणि त्यांनी नाटय़संगीतात क्रांती करून ते हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवलं.

या काळात नाटकांमधील गाण्यांची संख्या तुलनेनं कमी झाली; परंतु गायन अमर्याद झाले. संगीताच्या अतिरेकामुळे रंगभूमीची जी हानी झाली, त्यावर सुप्रसिद्ध नाटय़समीक्षक बाबुराव जोशींनी अशी मल्लीनाथी केली आहे की, ‘संगीताने प्रथमत: रंगभूमी गाजली खरी; परंतु तीच रंगभूमी अमर्याद संगीतामुळे नंतर गांजली.’ पु. ल. देशपांडे यासंदर्भात म्हणाले की, ‘शिरा तोच, पण सत्यनारायणाचा प्रसाद होऊन आल्यावर आपण द्रोणभरच देतो. तिथं काही बश्या भरभरून शिरा मिळावा अशी अपेक्षा नसते. सत्यनारायणाच्या शिऱ्यावर आडवा हात मारायचा नसतो. कारण पदार्थ तोच असला तरी त्याची भूमिका निराळी असते. रंगभूमीवरील या काळातल्या गाणाऱ्या नटांनी हे तारतम्य पाळलं नाही.’

संगीताचा अतिरेक केल्याचा परिणाम असा झाला की, त्यातलं नाटक आणि अभिनय दोन्हीही आक्रसून गेले. नाटक पाहून आल्यावर ‘नाटक आणि अभिनय चांगला झाला,’ असं म्हणण्याऐवजी ‘बालगंधर्व काय विलक्षण गायले!’ आणि ‘दीनानाथराव काय आक्रमक गायले!’ असे उद्गार प्रेक्षक काढू लागले. म्हणजे नाटक पाहायला जायचं ते गाणं ऐकण्यासाठी; त्यातील नाटय़ किंवा अभिनय पाहण्यासाठी नव्हे, असं व्हायला लागलं.

मामा वरेरकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, ‘सुरुवातीच्या काळात बालगंधर्व अभिनयापुरतं किंवा नाटय़ाला पोषक असंच गात असत. परंतु सवाई गंधर्व रंगभूमीवर फार गायला लागल्यामुळे बालगंधर्वानीही आपलं गाणं वाढवलं. बरं, त्यांचं गाणं काय कमी प्रतीचं होतं? मुळीच नाही. बालगंधर्व तर असं विलक्षण गात, की त्यांचं स्वर्गीय गायन ऐकायला अल्लादिया खाँसाहेबांसारखे गायक नाटकाला येऊन बसत असत. नंतरच्या काळात छोटा गंधर्व सोडून असे गायक निर्माण झालेच नाहीत.’

पुढच्या काळात रंगभूमीवरील पुष्कळसे गायक बालगंधर्व किंवा मा. दीनानाथ यांच्या गायकीचं अनुकरण करू लागले. परंतु बरेचसे गायक त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याऐवजी त्यांच्या दोषांचं अनुकरण करून आपण बालगंधर्व वा दीनानाथरावांची गायकी गातो, असा टेंभा मिरवायला लागले. परिणामत: संगीताचं (नाटय़संगीताचं) अक्षरश: डबकं झालं. गायनकलेची वृद्धी आणि उत्कर्ष व्हायचा असेल तर ती वाहती असायला हवी. नवनवीन स्रोत, नवीन विचार, नवीन ओघ त्यात मिसळले पाहिजेत. तसं झालं नाही. त्यामुळे नाटय़संगीताचा खळाळता प्रवाह अडून बसला.

१९४२ नंतर ‘कुलवधू’ वगैरे नाटय़निकेतनच्या नाटकांत ज्योत्स्नाबाई भोळ्यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीतगायन करून आणि नंतर छोटा गंधर्वानी आपल्या वेगळ्या गायकीनं नाटय़संगीताचा अडलेला हा प्रवाह बराचसा मोकळा केला. पण खऱ्या अर्थानं नाटकाला छेद न देता नाटकांबरोबर समांतर जाणारं नाटय़संगीत निर्माण केलं ते १९६० साली आलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ने! त्यानंतर १९६० ते १९८५ या काळात आलेल्या नाटकांत वसंतराव देसाई, छोटा गंधर्व, राम मराठे, नीळकंठ अभ्यंकर, प्रभाकर भालेकर वगैरे संगीतकारांनी फार चांगल्या चाली दिल्या.

१९६४ नंतर कल्पक व शास्त्रीय संगीतावर आधारित चाली देऊन नाटय़संगीताला प्रवाही आणि खळाळतं स्वरूप दिलं ते पं. जितेंद्र अभिषेकी यांनी! अभिजात संगीतावर आधारलेल्या चाली तर त्यांनी दिल्याच; परंतु ‘लेकुरे उदंड जाली’- ज्याला ‘संगीतक’ म्हणता येईल अशा हलक्याफुलक्या आणि ‘संत गोरा कुंभार’सारख्या भक्तिरसप्रधान नाटकाला चाली लावून आपण र्सवकष रचना करू शकतो हे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले.

पुन्हा १९८५ नंतर संगीत नाटकांचा आणि नाटय़संगीताचा अंधार सुरू झाला. त्यामुळे बरेचसे शंकेखोर लोक शंकाकुल होऊन ‘नाटय़संगीत कालबाह्य़ झालं आहे का? ते कुवतबाह्य़ झालं आहे!,’ अशी विचारणा करू लागले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तसं काही झालेलं नाही. पं. भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव यांनी नाटय़संगीताच्या लावलेल्या रोपाचा केशवराव भोसले, बालगंधर्व, दीनानाथराव, बापूसाहेब पेंढारकर यांच्या उत्कृष्ट गायनामुळं वटवृक्ष झाला आणि त्या वटवृक्षाची पाळेमुळे मराठी मनाच्या गाभाऱ्यात खोलवर गेली आहेत. नाटय़संगीत मराठी माणसाच्या जीवनात एवढं खोलवर रुजलं आहे, की ते महाराष्ट्रातून हद्दपार होणं शक्य नाही.

मात्र, मर्मबंधात वसलेली ही संगीत रंगभूमी पुन्हा उजळवून टाकायची असेल तर त्यासाठी काही ठोस उपाय योजण्याची गरज आहे. आज संगीत रंगभूमीवर जी थोडीफार नाटके अस्तित्वात आहेत, ती पाहायला प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत असतात. परंतु संगीत नाटकांकडे तरुण प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्याचे ईप्सित साध्य होण्यावर या रंगभूमीचे भवितव्य अवलंबून आहे. संगीत नाटकांकडे तरुण प्रेक्षकांना आकर्षित करून घ्यायचे असेल तर सध्याच्या रंगभूमीचे जुने स्वरूप नाहीसे करून तिला नवे रूप द्यायला हवे. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’, ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’ इ. लोकप्रिय संगीत नाटकांच्या गुणवत्तेचे नव्याने दर्शन घडवायला हवे. सर्वप्रथम या नाटकांच्या संहिता संपादित करून त्या नेटक्या आणि प्रयोगशील करायला हव्यात. त्याचप्रमाणे गाणीही मोजकीच घ्यायला हवीत. तरुण गायक अभिनेत्यांना प्राधान्य देऊन प्रयोगाचे सादरीकरणही नावीन्यपूर्ण करायला हवे.

संगीत नाटक थंडावण्याचे प्रमुख कारण म्हणजे नव्या संगीत नाटकांच्या संहितांचा अभाव हे आहे. नवी संगीत नाटकं केली जात नाहीत; कारण मुळात ती लिहिलीच जात नाहीत. आणि ती लिहिली जात नाहीत, म्हणून ती केली जात नाहीत, असं हे दुष्टचक्र आहे. विद्याधर गोखले यांच्यानंतर सातत्याने संगीत नाटके लिहिणारा नाटककार मराठी रंगभूमीला लाभला नाही. यासाठी संगीत नाटय़लेखनाच्या कार्यशाळा भरवून नवीन किंवा प्रचलित लेखकांना संगीत नाटकं लिहिण्यास प्रवृत्त करायला हवे.

संगीत नाटकांत संगीत कशा प्रकारचं असावं? अभिजात वा शास्त्रीय संगीतावर आधारलेलं असलं तर फारच उत्तम! फरक एवढाच, की शास्त्रीय संगीतावर आधारीत आहे म्हणून फार वेळ गाऊन किंवा ताना मारून चालणार नाही. भाव आणि रसोत्पत्ती साधेपर्यंतच; पण कसदार गायन असावं. सर्वच गायक-गायिकांना शास्त्रीय संगीतात गाणं म्हणणं जमणार नाही यास्तव सुगम संगीताचा वापर करायला हवा. सुगम संगीतात अभिप्रेत आहे ते भावगीत, लावणी, दिंडी, कामदा, लोकसंगीत वगैरे गायनप्रकार!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीत नाटक हे आनंदाचे आणि सुगंधाचे सुखनिधान असायला हवे. प्रसन्नतेने आनंदाचा शोध घेणे हे संगीत नाटकाचे अंतिम ध्येय झाले तर संगीत नाटक निखळ व स्वच्छ करमणूक देऊ शकेल आणि प्रेक्षकांची रंजकतेची, अभिरुचीची प्रतिष्ठित भूकही भागवू शकेल.

- रामदास कामत (लोकरंग, ६ नोव्हेंबर २०११)

12 June, 2011

मराठी नाट्यसंगीत - केशवराव भोसले

केशवराव भोसले - मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक. आपल्या क्षेत्रात पुढे जाताना दुसऱ्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाणे, आपल्याकडे नसलेली कला दुसऱ्यांकडून विनयाने आत्मसात करणे आणि असलेली कला दुसऱ्यांना देणे असे हे व्यक्तिमत्व होते.

केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. उदा - संगीत सौभद्र मधील तुळशी वृंदावन, फिडेल वाद्याचा उपयोग इ.

केशवराव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. ह्या नाटकाची तिकिटे १०० रु. ह्या दराने विकली गेली होती (१०० रु. हि त्यावेळची फार मोठी किंमत होती).

मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार ह्या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. हा त्या नाटकाचा पहिला उघड्या रंगभूमीवरील प्रयोग होता.

संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. त्या आधी म्हणजे १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला होता. त्याप्रसंगी पंडित विष्णू दिगंबर पळूस्कर यांनी केशवरावांच्या गायन शैलीवर भाषण केले होते.

१९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह उघडले गेले.

15 April, 2011

मराठी नाट्यसंगीत - गोविंदराव सदाशिव टेंबे

गोविंदराव टेंबे - मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातील एक उत्कृष्ठ कलाकार, संगीतकार आणि महाराष्ट्राच्या संगीत इतिहासातील सर्वोत्कृष्ठ पेटी-वादक. चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. नारायण सीताराम फडक्यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले. बालगंधर्व तर त्यांना गुरु मानायचे.

गोविंदरावांचा जन्म ५ जून १८८१ साली कोल्हापूर येथे झाला. अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देतात. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत.

गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोगहि करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. तसेच त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले.

१९१३ मध्ये प्रस्थापित झालेल्या गंधर्व नाटक मंडळीचे गोविंदराव काही टक्क्यांचे मालक होते. पुढे २ वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली.

९ ऑक्टोबर, १९५५ रोजी गोविंदराव वारले. जाताना त्यांनी मागे ग्रामोफोनच्या ७८ आर.पी.एम. च्या ३० रेकॉर्ड्स ठेवल्या आहेत. त्यात त्यांचे स्वतंत्र पेटी-वादन, त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत. गोविंदरावांनी प्रचंड लिखाणसुद्धा केले आहे. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.

गोविंदराव टेंबे यांच्या पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साईट पहावी.

11 March, 2011

संगीत मानापमान - मार्च २०११ - १००वे वर्ष

प्रथमत: नवीन पोस्ट लिहिण्यासाठी इतका मोठा खंड पडल्याबद्दल क्षमस्व. यापुढे नियमीत लिहीण्याचा प्रयत्न करीन.

संगीत मानापमान नाटकाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हे नाटक प्रथम काकासाहेब खाडिलकरांनी मार्च १९११ मध्ये रंगभूमीवर आणले होते. ह्या अजरामर नाटकबद्दल लिहिताना मला खूप आनंद होत आहे. मला माझ्या बायकोने जेव्हा ह्या नाटकाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत ह्याची आठवण करून दिली त्या क्षणी मी ब्लॉग पोस्ट लिहायला घेतली. बालगंधर्व, दीनानाथराव यांनी संगीत मानापमानाला एका उत्तुंग अश्या ठिकाणी नेऊन ठेवले आहे. ह्या नाटकातील पदे अत्युत्कृष्ठ आहेत.

प्रमुख पात्रे = भामिनी, धैर्यधर, लक्ष्मीधर, बाबासाहेब इ.

भामिनी ही एका अती-श्रीमंत घराण्यातील मुलगी. धैर्यधर भामिनीच्या वडिलांच्या सैन्यातील सेनापती. भामिनीचे वडील बाबासाहेब यांची अशी इच्छा आहे की भामिनी आणि धैर्यधर यांचे लग्न व्हावे. पण भामिनीच्या बहिणीला मुळीच असे वाटत नाही. तिला हवे आहे की भामिनीचे लग्न एका मोठ्या श्रीमंत घरात व्हावे आणि त्यासाठी तिने लक्ष्मीधर नावाच्या एका धनवान पण अती-भित्र्या माणसाला पसंतसुद्धा केले आहे. पण भामिनी मात्र ह्या गोष्टीशी सहमत नाही. ती म्हणते कशी "खरा तो प्रेमा न धरी लोभ मनी".

धैर्यधर हा अतिशय पराक्रमी असा सेनापती आहे. तो नेहमीच शूरांची पूजा करतो - यासाठी तो म्हणतो "शूरा मी वंदिले". लक्ष्मीधर भामिनीबद्दल धैर्यधरच्या मनात राग उत्पन्न करतो. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून भामिनी धैर्यधरच्या छावणी शेजारील बागेत वनमाला नाव धारण करून रहायला येते. तेथेच धैर्यधर तिला पाहतो आणि प्रेमात पडतो. शेवटी बाबासाहेब जेव्हा सांगतात वनमाला ही खरी वनमाला नसून भामिनी आहे तेव्हा धैर्यधरच्या मनातील भामिनीबद्दलचा राग निवळतो आणि ते लग्न करतात व लक्ष्मीधरची फजिती होते.

खर तर संगीत मानापमानाची कथा नुसती वाचून समाधान होत नाही. मराठी रंगभूमी निर्मितीच्या गंधर्व नाटक मंडळीनी चारुदत्त आफळे आणि अस्मिता चिंचाळकर समवेत संगीत मानापमान परत आणले आहे. ते नाटक यू-ट्यूब वर उपलब्ध आहे.


ह्या नाटकमधील पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साइट पहावी.

संगीत मानापमान