07 July, 2022

मराठी नाट्यसंगीत - भास्करबुवा बखले

संगीत स्वयंवर किंवा संगीत मानापमान नाटकांची पदं ऐकली कि २ नावं डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे गोविंदराव टेंबे आणि दुसरं म्हणजे भास्करबुवा बखले. 

१७ ऑक्टोबर १८६९ साली सुरतजवळील कठोर गावी जन्म झाला आणि त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वत: शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.

१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखलेयांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. 

८ एप्रिल १९२२ ला भास्करबुवांचे दुःखद निधन झाले.22 December, 2014

संगीत कुलवधू

प्रथमत: खूप दिवस ब्लॉग पोस्ट न लिहिल्याबद्दल क्षमस्व. काहीतरी नवीन लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आवडलं तर जरूर कळवा. 

अलीकडे (म्हणजे जवळपास वर्षभरापूर्वी) भारतात असताना एक संगीत नाटक बघण्याचा योग आला - 'संगीत कुलवधू'. ज्येष्ठ गायिका अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तब्बल ७० वर्षांनी पुन्हा २३ ऑगस्ट २०१३ रोजी ह्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून बघण्याची नितांत इच्छा होती, ती शेवटी ६ जानेवारी २०१४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पूर्ण झाली.  


ज्येष्ठ नाटककार मो. ग. रांगणेकर लिखित ‘संगीत कुलवधू’ नाटक १९४२ मध्ये रंगभूमीवर आले होते. विषयाच्या वेगळेपणाने आणि सुंदर पदांमुळे ते गाजले.  


महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने हे नाटक नव्या संचात सादर होत आहे. नायिकेची (भानू) भूमिका सावनी कुलकर्णी तर नायक (देवदत्त) श्रीरंग भावे याने रंगवला आहे. संगीत मार्गदर्शन राजीव परांजपे यांचे आहे. मूळ नाटकाला मा. कृष्णराव यांनी संगीत दिले होते. 


वैयक्तिक मत सांगायचे झाल्यास नवीन संगीत कुलवधू हे भरपूर प्रशंसा करण्याजोगं आहे. संवादफेक आणि गायन खूपच सुंदर आहे. पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या पण तरीही पत्नीचा उत्कर्ष सहन न होणाऱ्या पतीची हि गोष्ट आहे. नाटकातील सर्वच पात्रांनी खूप नैसर्गिक अभिनय केला आहे. ह्या नाटकाची गंमत अशी आहे कि, मा. कृष्णराव यांनी मूळ संगीत देताना पारंपारिक संगीत नाटकाचा बाज बदलून थोडा भावगीतांचा रंग भरला होता. सावनी आणि श्रीरंग यांनी 'बोला अमृत बोला', 'क्षण आला भाग्याचा', 'मनरमणा मधुसूदना', 'भाग्यवती मी त्रिभुवनी झाले', 'कितीतरी आतुर प्रेम आपुले', 'कटू भावना', 'का वदती अशा वचना' हि पदं कमाल गायली आहेत पण त्यात मला श्रीरंगने म्हटलेली 'कितीतरी आतुर प्रेम आपुले', 'कटू भावना' आणि सावनीने म्हटलेलं 'क्षण आला भाग्याचा' हि पदं विशेष भावली. उत्तम व्यतीत केलेली संध्याकाळ म्हणून मी ह्या नाटकाचा उल्लेख करेन. नाटक संपल्यावर श्रीरंग बरोबर संवाद साधण्याचाही योग जुळून आला. 


हे अतिशय स्तुत्य आहे कि अधिक संगीत नाटकं रंगभूमीवर परत येत आहेत. १९८५ साली जन्म झाल्यामुळे खूपच थोड्या संगीत नाटकांचा आस्वाद मला घेत आला आहे, पण संगीत कुलवधूसारखी अनेक नाटकं सादर व्हावीत आणि संगीत नाटकांचा तो सुवर्णकाळ तो सुवर्णकाळ परत याव्हा हीच इच्छा आहे. 


ह्या नाटकातील पदांसाठी 'आठवणीतील गाणी' ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी. 21 March, 2013

स्वरसम्राज्ञी

संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी सांगितलेली त्यांची संगीत कहाणी!


'नरवर कृष्णासमान' या पदाच्या वेळची रुक्मिणीची भावावस्था! कृष्णानं रुक्मिणीला 'गुरु'पद दिलं आहे, आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.. प्रियकराच्या प्रेमाचा साक्षात्कार होताच रुक्मिणी जणू बेभान झाली आहे. घराण्याची खानदानी बंधनं झुगारून ती कृष्णावरचं आपलं प्रेम व्यक्त करते आहे.. याच्या सारखा हाच 'नरवर कृष्णासमान'; केशवसुतांचं ..'काठोकाठ भरू द्या पेला । फेस भराभर उसळू द्या!' ची आठवण होते. आनंदाची उधळण अशीच असायला हवी! तो उन्मुक्त मोकळेपणा स्वरातून, भावातून, आविर्भावातून व्यक्त करताना मला जे समाधान मिळालं नेमका तोच समाधानाचा हुंकार रसिकांच्या प्रतिसादातून मिळत असे.'' 'सौभद्र', 'स्वयंवर',' शारदा','स्वरसम्राज्ञी' आदी अनेक नाटकांतल्या भूमिका अजरामर करणाऱ्या, संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी सांगितलेली त्यांची संगीत कहाणी!

संगीत आणि संगीत नाटकं याचं आणि माझं नातं माझ्या जन्माआधीपासूनच जुळून गेलंय. आईच्या पोटात मी होते तेव्हा खरं तर विश्रांतीसाठी ती नानांच्या बरोबर भारत नाटक मंडळीच्या बिऱ्हाडी गेली होती. मंडळींचा सावंतवाडीला दोन महिने मुक्काम होता. त्याच दरम्यान अचानक प्रमुख नायिका कोर्टाच्या कामानिमित्त पुण्याला गेली आणि लोकाग्रहास्तव 'सौभद्र' नाटकातील सुभद्रेची भूमिका आईला करावी लागली होती! पण खऱ्या अर्थानं माझं रंगमंचावर पहिलं पाऊल पडलं ते वयाच्या दहाव्या वर्षी 'सौभद्र' तील नारदाच्या भूमिकेनं. त्यानंतर थोडय़ाच काळात 'सौभद्र'चा पूर्ण प्रयोग लता (बहीण) मी आणि चुलतभाऊ सुरेश.. अशा तीन शिलेदारांनी साकारला. त्याचं असं झालं.. बिऱ्हाडी स्वरूपाची 'मराठी' रंगभूमी ही संस्था १९५८ साली बंद झाली आणि मुलींच्या शिक्षणासाठी नाना, आई (जयराम आणि जयमाला शिलेदार) पुण्यात स्थायिक झाले. मराठी रंगभूमीचं काम नाइट पद्धतीनं सुरू झालं. नाना-आईंची नाटकं बघता बघता नाटकातले संवाद आणि पदं आम्हा मुलांना पाठ होऊन जात. नंतर नाटकातल्या चुका, विसंगती आम्हा मुलांच्या लक्षात येऊ लागल्या.. घरी आल्यावर त्यांच्या नकला, विडंबनं करण्यात आम्ही रमून जायचो. त्या नकला तालासुरात असल्यामुळं नाना समजून चुकले की मुलं संगीत नाटकानं भारून गेली आहेत.. त्यांच्यात काही विशेष आहे! आमच्यातल्या कलागुणांना आकार देण्यासाठी त्यांनी आमच्यासमोर 'सौभद्र' नाटकाचं आव्हान ठेवलं. लताचा गळा चांगला फिरत असल्यानं महत्त्वाच्या भूमिका तिला दिल्या गेल्या. माझा गळा.. तान अजिबात फिरत नसे! पण सूरताल ठिकठाक! आईनं पदं बसवून घेतली. तिचं कौशल्य असं, की आवाजाच्या नैसर्गिक धाटणीला धक्का न लावता तिनं बेहेलाव्यानी पद रंगवण्याची पद्धत अंगीकारली.


या सुमारास रा. ना. पवारलिखित 'कविराय राम जोशी' नाटकाचे प्रयोग जोरात सुरू होते. त्यात सवाल-जबाबाच्या सीनला पडद्याच्या आतून झील देण्यासाठी आम्ही मुली उत्साहानं तयार असायचो. नानांच्या चढय़ा आवाजाला वरच्या पंचमापर्यंत जाऊन 'जी जी' म्हणताना मला स्फुरण चढत असे! त्यातूनच हिची पट्टी इतर मुलींहून चढी असावी असा अंदाज आईला आला. 'शारदा' नाटक बसवलं जात होतं. कोणत्या पट्टीत कीर्तीचा आवाज सहज फिरेल याची चाचपणी करताना काळी एक पट्टी योग्य वाटली. 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाच्या वेळी माझी पट्टी सापडली. धिमी लय, स्वराचे आर्त लगाव, िमड जपत, आस जपत पद साकारणं.. अशा बारकाव्यानिशी आईनं ते पद शिकवलं. शारदेची भूमिका करताना हे पद म्हणजे जणू मला शारदेचा दबलेला आक्रोशच वाटे. शारदेवर ओढवलेला प्रसंग, वडिलांचा जुलमी जाच, मैत्रिणींची जीवघेणी थट्टा.. आजोबा शोभेल अशा वयाच्या माणसासमोर वधू-परीक्षेला जाण्याचा दारुण अनुभव.. या साऱ्यांचा माझ्यावर परिणाम होत असे. हे पद म्हणताना गळा कातर होत असे.. डोळ्यांतून कारुण्य ओसंडू लागे. त्याच वेळी भावनांवर आवर घालून पद साकारणं ही मोठी कसोटी वाटत असे.. पण थोडय़ा वेळातच स्थिरता येऊन पद साकारता येई. हा एक विलक्षण अनुभव असे. लताजवळ आमचे थोर नाटय़गुरू मा. दत्तारामबापूंनी माझ्या अपरोक्ष दिलेली शाबासकी आठवली की मन भरून येतं. 'कीर्ती शारदेचं काम समजून करते!'


'रंगात रंगला श्रीरंग','ययाति आणि देवयानी' अशा नाटकांतून उमेदवारी करत असताना मला 'स्वयंवर' नाटकातल्या रुक्मिणीचं आकर्षण वाटू लागलं. आई अनेक विद्यार्थिनींना नाटय़संगीत शिकवत असे. त्यावेळेस ठेका धरायला मीच बसत असे. ऐकून ऐकून माझी 'स्वयंवर'मधील गाणी बसून गेली.. आणि मी नानांजवळ 'रुक्मिणी'च्या भूमिकेचा हट्ट केला! नाना म्हणाले, ''आधी पदं म्हणून दाखव मग विचार करू.'' अर्थातच मी सगळी महत्त्वाची पदं तालासुरात म्हणून दाखवली. नानांना विश्वास वाटला. पुन्हा नव्यानं आईपुढं बसून पदांची तालीम सुरू केली. गद्य भाग बसवण्यासाठी मला वसईला दत्तारामबापूंचं मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवलं गेलं. त्यांनी संवादफेक आणि रुक्मिणीचा खानदानी रुबाब, तिचा आई, वडील, भाऊ आणि प्रियकर कृष्णाबरोबर होणारा संवाद, तिचं आत्मकथन या सर्वाची चांगली जाणीव देऊन रुक्मिणी समजावून सांगितली. आमच्या मराठीचे प्राध्यापक वि. वि. पटवर्धनसरांनी अवघड गद्य व पदांचे अर्थ समजावून सांगितले. 'स्वयंवर' नाटकावरील लिखाण, टीका त्यांनी मला वाचायला लावल्या. आईनं साकारलेल्या रुक्मिणीपेक्षा माझी 'रुक्मिणी' वेगळी होत होती.. नाना-आईंना तेच अपेक्षित होतं. प्रत्येक भूमिकेचा वेगळा अभ्यास करायला त्यांनी पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं होतं. 'स्वयंवर'मधील पदं म्हणताना मला खूप आनंद वाटे. साथीला चंद्रशेखर, संजय हे देशपांडे बंधू असत. व्हायोलिनला बबनराव गोखले, ए. पी. फाटक, तर तबल्यासाठी विनायकराव थोरात! पदं साकारताना मी माझी एक वेगळी शैली तयार केली. उदाहरणार्थ 'नरवर कृष्णासमान' या पदाच्या वेळची रुक्मिणीची भावावस्था! कृष्णानं रुक्मिणीला 'गुरु'पद दिलं आहे, तिचं पाणिग्रहण करण्याचं वचन दिलं आहे, आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.. प्रियकराच्या प्रेमाचा साक्षात्कार होताच रुक्मिणी जणू बेभान झाली आहे. घराण्याची, जबाबदारीची खानदानी बंधनं झुगारून ती कृष्णावरचं आपलं प्रेम व्यक्त करते आहे.. याच्यासारखा फक्त हाच 'नरवर कृष्णासमान'; केशवसुतांची कविता आठवली, 'काठोकाठ भरू द्या पेला । फेस भराभर उसळू द्या!' आनंदाची उधळण अशीच असायला हवी! तो उन्मुक्त मोकळेपणा स्वरातून, भावातून, आविर्भावातून व्यक्त करताना मला जे समाधान मिळालं नेमका तोच समाधानाचा हुंकार रसिकांच्या प्रतिसादातून मिळत असे. पद अभिव्यक्त करण्याची माझी नवी कल्पना रसिकांनी उचलून धरली. त्या वेळी सादर होणाऱ्या संगीत नाटकातील बरेचसे कलाकार नाटकातून पदं गाताना गायकीवर अधिक लक्ष केंद्रित करत असत. कैकदा भूमिकेतून अलिप्त होऊन ही गायकी प्रकट होत असे.. अर्थात त्यावेळचा रसिकवर्ग नाटय़वेडापेक्षा संगीतवेडा अधिक होता.. त्यामुळं ती संगीत नाटकंही लोकप्रियतेत कुठंही कमी नव्हती. रुक्मिणीच्या भूमिकेत मी, कृष्णाच्या भूमिकेत विश्वनाथ बागूल आणि भीष्मक- महाराणीच्या भूमिकेत नाना, आई! अशा यथोचित पात्रयोजनेमुळं, नावीन्यामुळं, ताजेपणाच्या स्पर्शानं 'स्वयंवर' टवटवीत झालं आणि रसिकांच्या पसंतीला उतरलं.


त्यानंतर शारदा, सुभद्रा, रेवती, भामिनी, वसंतसेना, शकुंतला, मंथरा, सिंधू, द्रौपदी, देवयानी, कान्होपात्रा अशा बालगंधर्वानी रंगवलेल्या बारा नायिका करण्याची संधी मला मिळाली. मी त्या सर्व भूमिकांच्या प्रेमात पडले.. अभ्यासानं मी त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वात भिनवून घेतलं.. आणि प्रत्येकवेळी त्या साकारताना मला अपरंपार आनंद झाला! संगीत नाटकांनी वेगवेगळ्या प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या नवरसप्रधान अभिनयाची केलेली ही उधळण त्या नायिकांमधून मला मिळत गेली. संगीत नाटकांचं हे ऋण कसं बरं फिटणार?

बारा, जुन्या संगीत नाटकांबरोबर आमच्या 'मराठी' रंगभूमीनं पंचवीस नवी संगीत नाटकं रंगभूमीवर आणली. जुन्या नाटकांइतकी लोकप्रियता नव्या संगीत नाटकांना सहजासहजी लाभत नाही. खूप अपयश पचवल्यावर 'स्वरसम्राज्ञी'सारखं एक यश परमेश्वरानं आमच्या पदरात टाकलं. १९७२ साली विद्याधर गोखलेंनी 'पिग्मॅलियन', 'माय फेअर लेडी'च्या विषयावर आधारित 'स्वरसम्राज्ञी' नाटक लिहिलं. भारतीय वातावरणात ते कथानक जुळवून घेताना नायिकेचा सुरवंटातून फुलपाखरू बनण्याचा प्रवास भाषेपेक्षा संगीतामध्ये जास्त खुलत होता हे लक्षात घेऊन त्यांनी, 'नायक गंगाधर एका तमाशातील लावणी गायिकेला शास्त्रीय संगीताची गायिका बनवण्याचे स्वप्न सत्यात आणतो' असा आराखडा रेखला. ते कथानक आम्हा सर्वाना फारच आवडलं. या नाटकामुळं पं. नीलकंठ अभ्यंकरांसारख्या महान संगीतकाराची ओळख झाली. गंधर्वभक्त असल्यामुळं नाना, आई आणि अभ्यंकर बुवांचे विचार एकदम जुळले. बुवांची ओळख होण्याआधी मी 'स्वरसम्राज्ञी'तल्या मैनेसारखीच शास्त्रीय संगीतापासून पळ काढणारी होते. पण बुवांनी शास्त्रीय संगीताच्या मंदिराचं द्वार असं काही खुलं केलं की या अपार आनंदापासून इतके दिवस आपण दूर का राहिलो याचा पश्चात्ताप वाटू लागला. अर्थातच मी आणि लता तेव्हापासून बुवांकडं शास्त्रीय संगीत शिकू लागलो. 'स्वरसम्राज्ञी' नाटकाच्या निमित्तानं बुवांनी खूप काही नवे विचार दिले. भावना परिपोषासाठी श्वासाचाही कसा उपयोग होऊ शकतो.. बोलीभाषेत लघुगुरू सांभाळून जसे उच्चार केले जातात, तसे पद गातानाही केले पाहिजेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. गळा फिरेल तसे न गाता, आपल्या मनात जसा स्वरबंध असेल तसाच गळा फिरायला हवा.. अर्थात गळ्यावर आपल्या बुद्धीची हुकमत असली पाहिजे. गाण्याचा जो प्रकार आपण गाणार असू तो त्या ढंगातच गायला गेला पाहिजे. हे सगळं दिसायला सोपं वाटत असलं तरी अंगीकारायला फारच कठीण होतं. पण बुवा स्वत: गाऊन त्याचा प्रत्यय देत असत. 

'स्वरसम्राज्ञी' नाटकातील सगळी गाणी अतिशय उत्तम बांधली गेली आहेत. नायिका मैनेसाठी बैठकीची लावणी, ठुमरी, शास्त्रीय चीजा, छक्कड लावणी, भावगीत, गझल असे वेगवेगळे प्रकार योजले गेले. अभ्यंकर बुवांनी संगीत सहायक म्हणून बावीस र्वष सी. रामचंद्रांसारख्या प्रतिभाशाली संगीतकाराबरोबर काम केलं होतं. त्या अनुभवांचा फायदा 'स्वरसम्राज्ञी'च्या संगीत रचनांना मिळाला! कथानकात रस परिपोष साधण्यासाठी त्यातील नाटय़ नेमकं टिपून ते तालासुरात झेलण्याची तरलता बुवांपाशी होती. पदातल्या शब्दांवर कवीइतकंच प्रेम करणारे बुवा शब्दोच्चारणातली लहानशी चूकही खपवून घेत नसत. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या 'अभोगी' नाटकातल्या एका पदात तारसप्तकातल्या षड्जापासून वर मध्यमापर्यंत आकारात एक िमड घ्यायची होती.. ती अवघड जात होती.. आवाजावर कमालीचं नियंत्रण ठेवून ती जागा घेताना वरचा मध्यम जरा कमी-जास्त झाला तर बुवा एकदम संतापत होते. ''कोणतीही सबब चालणार नाही.. शेंडी तुटो की पारंबी.. वरचा मध्यम स्वरात लागलाच पाहिजे!'' कोणतीही गोष्ट करायची झाली तर जीव घालूनच केली पाहिजे, अशी ती शिकवण होती.

शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात झाल्यावर आकाशवाणीवर ऑडिशन होऊन शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत कलाकार म्हणून अनेक संधी मिळाल्या. अनेक चेनबुकिंग, दोन वेळा अखिल भारतीय मंगळवारीय संगीत सभेत गाण्याचा मान मिळाला. पूर्वी बुधवारी सकाळी प्रत्यक्ष प्रसारणासाठी सकाळचा राग गावा लागत असे. एकदा पतंजली मादुसकरांनी त्या कार्यक्रमासाठी बोलावलं.. त्यावेळी बुवांनी मला शिकवलेली, रत्नकांत रामनाथकारांनी 'देसी' रागात बांधलेली, रूपक तालातील चीज मी गायले होते. ती ऐकून संगीतज्ञ वामनराव देशपांडय़ांनी मुद्दाम फोन करून मला शाबासकी दिली होती. शास्त्रीय संगीताबरोबरच बुवांनी मला काही हिंदी, गुजराथी रचना, भजने, भावगीतं शिकवली होती. भूज, राजकोट, अहमदाबादच्या चेनबुकिंगमध्ये त्या गुजराथी भजनांना खूप दाद मिळाली. बुवांमुळे अनेक गुणिजनांशी परिचय झाला. पं. भाई गायतोंडे, विश्वनाथ पेंढारकर, सुधीर संसारे, केशवराव चाफेकर, गणादादा पुराणिक, दादा आपटे, शांताबाई आपटे.. आम्ही सगळे एकत्र येऊन खाणं, गाणं, गप्पा गोष्टी करत असू.. फार चांगले दिवस होते ते.. त्यातूनच त्रिवेंद्रमची सफर आयोजित झाली. केशवराव चाफेकरांनी त्यांच्या जावयांकडे.. थोर शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव आणि सुधाताईंकडे आम्हा सर्वाना पाहुणचारासाठी नेलं. फार सुंदर सहल झाली. डॉक्टरसाहेबांनी रॉकेट लाँचिंगचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्या मुक्कामात त्यांनी 'शंकराभरणम्' चित्रपट पाहण्याचा आग्रह केला. संगीतावर आधारित असलेला तो चित्रपट आम्हा सगळ्यांना खूप आवडला. त्यातील 'शंकराभरणम्' गाण्यानं मला वेडं केलं. हे आपल्याला यायला हवं असा ध्यास लागला. त्या गाण्याचं रेकॉर्डिग मिळवून.. सारखं गुणगुणून मी ते आत्मसात केलं. नगरच्या एका मैफलीत मी बेधडक ते गाऊन पाहिलं. त्याला फार छान दाद मिळाली. मग एका तेलुगू गृहस्थांकडून मी शुद्ध तेलुगू उच्चार आणि गाण्याचा अर्थ समजावून घेतला. ललित कलादर्शच्या अमृत महोत्सवाचा सोहळा हुबळीला झाला होता. पुण्या-मुंबईतले झाडून सगळे कलाकार त्यात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात मी आवर्जून 'शंकराभरणम्' गायले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या सोहोळ्यात 'शंकराभरणम्'नं खास छाप उमटवला. वन्समोअरचा गडगडाट, थोर लेखक रणजित देसाईंनी उभं राहून पुन्हा गाण्याची केलेली विनंती.. 'पुन्हा शंकराभरणम्' आणि टाळ्यांचा कडकडाट! तो क्षण मला मोरपिसासारखा वाटतो!

आंध्रच्या चेनबुकिंगमध्ये असाच एक आगळा अनुभव मला आला. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या कलाकारांचं नाटय़संगीत हैदराबाद, विशाखापट्टणम्, विजयवाडा,कडाप्पा या शहरात आयोजित होतं. प्रवासात तेलुगू आणि मराठी कलाकारांची छान ओळख झाली. त्यातून देवाणघेवाण होऊन तेलुगूकृष्ण पृथ्वीरामारावना आईनं 'राधाधर मधुमििलद' हे पद शिकवलं, तर पृथ्वीनं मला गंधर्वभक्त रघुरामय्यांचं तेलुगू भजन 'रामनील मेघस्यामा' शिकवलं. मी ते सारखं गुणगुणत होते. तेलुगू दुर्योधन अच्युत वेंकट रत्नम्नं मला विजयवाडय़ाच्या कार्यक्रमात ते पद गाण्याची विनंती केली. मी गायले. त्याला रसिकांची दाद तर मिळालीच; पण एक वेगळी गोष्ट अशी झाली.. त्या कार्यक्रमाला दिवंगत रघुरामय्यांच्या पत्नी आल्या होत्या.. त्यांना गहिवरून आलं.. त्या म्हणाल्या,''मुली, हा काय योगायोग आहे? काही वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडय़ांच्या आग्रहावरून माझे पती पुण्याला गेले होते.. त्यांनी तिथं बालगंधर्वाचं एक मराठी पद 'मूर्तिमंत भीती उभी' म्हटलं होतं.. त्याच पुण्यातून एक मुलगी विजयवाडय़ाला येते आणि माझ्या नवऱ्याचं तेलुगू भजन म्हणते!'' हा संगीत योग खरंच अविस्मरणीय होता.

केवळ गंभीर, करुण आणि शृंगार रसावर आधारित पदांनाच लोकप्रियता लाभते असा समज असतो. चंचल गाण्यांनाही छान दाद मिळू शकते हे मला 'रेवती'च्या 'हृदयी धरा हा बोध खरा' या पदामुळं कळलं. अर्थात वेगळं करून बघण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे मला हे बक्षीस मिळालं होतं! 'रेवती' अल्लड आणि थट्टेखोर आहे या वाक्याचं 'इंप्रोवायझेशन' मी 'हृदयी धरा' या पदात करून पाहिलं. त्यात माझ्या नकल्या स्वभावाची मदत मिळाली. भजन प्रकाराची सुरुवात मी 'हृदयी धरा' इतकंच म्हणून शंृगारिक ठुमरीच्या आविर्भावात केली. 'अश्विन शेट'ला खुलवून शेवटी थंड पाणी ओतल्यासारखं 'हा बोध खरा' असं भजन सुरू केलं. रेवतीचा सगळा खटय़ाळपणा त्या पदात खळाळत राहिला.. गाण्यातून अश्विनशेटची उडवलेली टर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. कोल्हापूरच्या एका आजींनी आपल्या हातातली सोन्याची बांगडी मला त्या अदाकारीसाठी बक्षीस दिली!

'कान्होपात्रा' नाटकातल्या कान्होपात्राच्या भूमिकेनं मला परमेश्वर सान्निध्याचा आध्यात्मिक अनुभव मिळाला. मा. कृष्णरावांचं सुंदर संगीत, कान्होपात्रेच्या उत्कट काव्यरचना.. तिचा जीवन संघर्ष आणि परमेश्वरचरणावर तिचा होणारा देहान्त.. ही विलक्षण वेगळी गोष्ट होती. इथं टाळ वाजवून भजन म्हणण्याची मला हस्तगत झालेली कला उपयुक्त ठरली. 'अवघाचि संसार, अगा वैकुंठीच्या राया' ही पदं म्हणताना होणारा आनंद वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. स्वत:चा विसर पडण्याइतका खोल परिणाम जाणवतो. चांगला प्रयोग, जमलेली मैफल तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. दोन-तीन दिवस तुम्ही त्या सुंदर अनुभवात तरंगत राहता!

काही काळ मी पंढरपूरच्या प्रख्यात शंकरअप्पा मंगळवेढेकर यांच्याकडं मृदंगाचे धडे घेतले होते. पाठीच्या दुखण्यामुळं ती आवड मला जोपासता आली नाही. पण जेव्हा शिकत होते, त्याच सुमारास शंकर अप्पांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त कार्यक्रम योजले होते. त्यात त्यांनी मला मृदंगावर चौताल वाजवायला सांगितला! नुकतंच तलावात तीन फूट पाण्यात पोहायला शिकणाऱ्याला एकदम खोल पाण्यात पोहण्याची आज्ञा झाल्यावर त्या नवशिक्याचं जे काही होईल तसं माझं झालं. जे शिकले होते त्याची तालीम करून धीर एकवटून मी मृदंगवादनाला सुरुवात केली. एकदीडीच्या वजनाचा बोल वाजवायला सुरुवात केल्यानंतर जाणवलं, चुकून आपण तो बोल दुपटीच्या वजनात वाजवतो आहोत. अर्थातच लक्षात आलं.. हा बोल समेच्या खूप आधी संपणार आहे.. समोर बसलेल्या जाणकारांनाही ते लक्षात आलं होतं.. बोल संपला.. उरलेल्या जागेत काहीतरी वाजवायचं म्हणून मी 'तिटकत गदीगन धा'चा तिय्या वाजवला!.. खड्डय़ात कोसळणार याची खात्री असतानाच.. अवघड करामतीनंतर सुरेख लँिडग करणाऱ्या जिमनॅस्टसारखी मी डौलात समेवर पोहोचले होते! ती सुंदर सम माझी नसून ज्याच्या मंदिरात ते मृदंगवादन चाललं होतं त्या 'पांडुरंगा'ची होती!

आमचे नाना-आई प्रयोगाला 'खेळ' म्हणायचे. संगीत नाटकाचा खेळ त्या दोघांनी मन:पूर्वकपणं खेळला. आम्ही मुली त्याच वेडानं पछाडलो आहोत हे कळल्यावर आम्हाला परावृत्त न करता त्या खेळात आम्हालाही सहभागी करून घेतलं. 'संगीत नाटक', 'संगीत मैफल' या जिवंत कला आहेत. त्या प्रत्यक्ष घडल्या पाहिजेत तरच त्यांच्या चैतन्यानं कलाकार आणि रसिक तल्लीन होऊन आनंदात न्हाऊन निघतील. नाना, आई आणि अभ्यंकरबुवांनी मला घडवलं.. संगीताचा आणि नाटकाचा वसा प्राणपणानं कसा जपावा हे शिकवलं. संगीताचं माझ्या आयुष्यातलं स्थान श्वासोच्छवासासारखं आहे. नानांच्या निर्वाणानंतर आयुष्यात कसोटीचा काळ आला होता.. त्या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी हात दिला संगीतानंच!.. संवेदनाशील मनावर फुंकर घातली संगीतानंच आणि ताठ मानेनं जगण्याची प्रेरणा दिली संगीतानंच! आकाशवाणीवरच्या एका संगीत सभेत माझी ओळख करून देताना प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर म्हणाले होते, ''संगीत ही कीर्तीची मातृभाषाच आहे!''

चतुरंग (लोकसत्ता पुरवणी)
१६ मार्च २०१३
(http://www.loksatta.com/chaturang-news/interview-of-kirti-shiledar-82048/)

01 March, 2012

'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...

मराठी रंगभूमीला पडलेले भरजरी स्वप्न म्हणजे ' बालगंधर्व ', मराठी नाट्यसंस्कृतीचा सुरेल इतिहास म्हणजे ' बालगंधर्व ' ... १९८६ मध्ये बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या गंधर्वगौरवाचा हा पुनर्प्रत्यय...

ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असले तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्य हिशेबी हे बालगंधर्वनाम संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा ह्या महाराष्ट्राच्या नाट्य कला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.रहस्य कायमच


जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम दर्जाचे कार्य करणा-यांना श्रेष्ठत्व मिळते, लोकप्रियता मिळते, पण विभूतिमत्व लाभतच असे नाही. ही कुणी कुणाला उचलून द्यायची पदवी नाही. विभूतिमत्त्वाच्या देवाणघेवाणीची तिथे सांगता नसते. बालगंधर्वांना असे विभूतिमत्व लाभले आणि ते देखिल ज्या काळात ते वावरत असलेल्या नाट्यक्षेत्राकडे अवहेलनेने पाहिले जायचे, अशा काळात असंख्य रसिकांच्या मनात त्यांनी घर केले. ह्यामागील रहस्य शोधून काढायचा अनेक कलावंतांनी आणि कलासमीक्षकांनी प्रयत्न केला त्यांच्या अभिनयगुणांचं, गायनातल्या वैशिष्ट्यांचं, त्यांच्यातल्या उणिवांचे विश्लेषण करणारे लेख लिहिले. भाषणं केली. आपली चिकित्सक बुद्धी पणाला लावली. एवढे करूनह या कलावंताला लाभलेल्या विभूतिमत्त्वाचे रहस्य हाती पूर्ण लागल्याचे समाधान कुणाला मिळाले असेल असे वाटत नाही. वास्तविक बालगंधर्वाहून अधिक सुंदर दिसणारे आणि अधिक प्रभावी रितीने गाणारे कलावंत त्यावेळी होते आणि आजही आहेत. अण्णा किर्लोस्करांच्या शाकुंतल, सौभद्रपासून आजतागायत चालत आलेल्या मराठी नाटकांविषयीच्या मराठी रसिकांच्या मनातल्या जिव्हाळ्याची ज्यांना कल्पना नाही अशी माणसं तर म्हणतील की स्त्रीवेश घेऊन नाटकात नाचणा-या एका नटाचं ही मंडळी हे काय एवढे स्तोम माजवताहेत. त्यांना बालगंधर्वांना लाभलेल्या रसिकांच्या प्रेमाची प्रतच कळणं अवघड आहे. म्हणूनच कविवर्य माडगुळकर जेव्हा ' असा बालगंधर्व आता न होणे ' अशी ओळ लिहून गेले तेव्हा हजारो मराठी रसिकांना कवी आपल्या मनातले बोलला असे वाटले.


सूर बरसणारा वरूण


अत्यंत अवघड गोष्टी अगदी सोप्या आहेत असे करून दाखवणे ही असमान्य प्रतिभावंतांनाच साधणारी किमया आहे. गहन तत्त्वज्ञान देखिल ग्यानबा-तुकाराम सोपं करून सांगतात आणि वरपांगी सोपी वाटणारी ओवी किंवा अभंगातील ओळ अनुभवायचा प्रयत्न करायला लागलो की ती ओळ किती खोल पाण्यातून आली आहे याची जाणीव होते. इथे आपले हात जोडले जातात तेही असली अद्भूत किमया घडवणा-या प्रतिभा नावाच्या शक्तिपुढे. कुणी मग त्याला देवाचे देणे म्हणतात, कुणी पूर्वजन्माची पुण्याई म्हणतात, त्या तर्कापलिकडल्या अनुभवाला काहीतरी म्हटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही आणि मग आपण काहीतरी म्हणत असतो. पण असले आनंददायक अनुभवच आयुष्यभर आपले खरे सांगाती असतात. आयुष्यातील सारी कृतकृत्यता असल्या अनुभवांच्या क्षणांची एखाद्यापाशी किती साठवण आहे यावर जोखायची असते. ज्यांना श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणावे असे कलावंत वरूणसारखी असल्या आनंदांच्या सरींची बरसात करून असंख्य मनांचे मळे फुलवित असतात. बालगंधर्व हा असाच एक वरूण, सूर बरसत राहणारा. नुसत्या गाण्यातूनच नव्हे तर गद्यातूनसुद्धा. त्यांच्या नुसत्या स्मरणाने भीमपलास, बागेश्री, यमन, बिहाग, खमाज या रागांची एकदम कारंजी मनात उडायला लागतात. तसेच तुषार स्वयंवरातील ' दादा ते आले ना ' किंवा ' खडा मारायाचा झाला तर ' किंवा एकच प्यालातील ' हे चरण जिथं असतील तोच माझा स्वर्ग ' किंवा दौपदीतल्या ' जा ! दुःशासनाला म्हणावं दौपदी स्वतंत्र आहे. दौपदी कुणाची दासी नाही बरं. दासी नाही ' यासारख्या गद्य वाक्यांच्या स्मरणानेही उसळतात. त्यांची ' अन्नदाते मायबापहो ' ही आर्जवी हाक आठवली की त्या स्मरणाने अंगावर काटा उभा राहतो. मन भरून येते. आयुष्यातल्या एका पुष्पपरागसुगंधित स्मृतिपथावरून आपण सहलीला निघाल्यासारखे वाटतं. हा स्मृतिपथ किती दूरवर घेऊन जाईल ते सांगता येत नाही.


नाटक नव्हे, शुभकार्य


गंधर्वांचे नाटक पाहणे हे नुसते तिकीट काढणे आणि थेटरात जाऊन नाटक पाहाणे एवढंच नसे. कुटुंबात एखाद शुभकार्य निघावं तसं गंधर्वाचं नाटक पाहायला जाण्याचं कार्य निघायचं. थेटरात तास तास आधी जाऊन पोहोचायचं. मग गणपतराव बोडस, मास्तर कृष्णराव, रानडे ही मंडळी रंगपटाकडे जाताना बघायला मिळत. विठोबाच्या देवळाच्या प्रांगणात निवृत्ती, ज्ञानदेव ही संत मंडळी साक्षात दिसावी तसं वाटे. आमची तिकिटे पिटातली किंवा त्यांच्या आसपासची माडीवरची असायची. मग माडीवरून खाली पुढल्या कोचाकडे येणारी धनिक मंडळी दुरून पाहायची. एकदा ह्याच ऑपेरा हाऊसमध्ये अल्लादिया खाँसाहेब आले होते. वडलांनी मला त्याला वाकून नमस्कार करायला लावला होता. वडलांचे बालपण कोल्हापूरात गेल्यामुळे अल्लादिया, बुर्जीखाँ, मंजीखाँ ही नावे माझ्या कानावरून फार लहानपणीच गेली होती. त्या एकच प्यालानंतर पुढे बालगंधर्वांची पुढे कितीतरी नाटके पाहिली. रिपन थेटरात पाहिलेल्य त्यांच्या कान्होपात्रेत शेवटी विठ्ठलचरणी विलीन होऊन काष्टवत झालेली कान्होपत्रा पाहताना अभिनयातला तो मला एक चमत्कार वाटला होता. त्या नाटकाच्या प्रयोगाची एक मजेदार आठवण आहे. एरवी स्टेजसमोर गादीवर बसून आपल्या तबल्याने लोकांना जागच्याजागी नाचायला लावणारे थिरकवा खाँसाहेब गंमत म्हणून नाटकातल्या भजनात वारकरी वेश चढवून पखवाजी पांडोबा बोंद्र्यांच्या शेजारी टाळ वाजवित नाचत होते.


माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायक वादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांची तुल्यबळ म्हणावे असे आजही तरुण गायक-गायिकांचे गाणे, वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तासतास तयारीने पिसलेल्या भीमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भीमपलासात ' देवा धरले चरण ' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की सगळा भीमपलास एका क्षणात आपल्या शरिराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही केवळ रम्य ते बालपण छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांकित द्वारका बुडून जाणार की काय अशी भिती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली ते कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुनर्जन्म घेतल्यासारखी प्रकटली. बालगंधर्वांना ज्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही, की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधीकधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे मॉड संस्कार असेलेली तरुण मुलंमुली जर चांगल्या संगतीची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ-सत्तर वर्षांपूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदाने दाद देताना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तीची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निगर्सप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता ह्या दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहतो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणा-या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वाच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते.


स्वरदानाचे वरदान


शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंम् अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती परमेश्वरासारखे संपृक्त स्वरूपातले दर्शन त्याने घडवले आणि ते ही कुठून ? तर स्वतःला शिष्ट समजणा-या समाजातल्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरून, आंगणातल्या मातीत रांगणा-या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा ‘ आ ’ करून यशोदेला विश्वरूपदर्शन घडवले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या ‘ आ ’ कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचारहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीत कलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरा-माजघरात गंधर्वाचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरूषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांची सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वतःला धन्य मानावं.


म्हणून म्हणतो की, ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे ‘ गंधर्वनाम संवत्सर ’ च आहे.


(‘ कालनिर्णय ’ च्या सहकार्याने)


महाराष्ट्र टाईम्स

६/५/२०११
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8171275.cms

12 November, 2011

दुखणे संगीत रंगभूमीचे!

नेहमीपेक्षा थोडी वेगळी अशी पोस्ट. रामदास कामत समर्पक लेख.

संगीत रंगभूमीची आजची दुरवस्था का झाली, याचा शोध घेऊ जाता अनेक कारणं सापडतात. त्यात संगीत नाटक लिहिणाऱ्या लेखकाची वानवा, गायनाचा अतिरेक, नव्या तरुण कलावंतांनी त्याकडे फिरवलेली पाठ, वगैरे वगैरे. परंतु नव्याने संगीत नाटकांचा विचार झाला तर संगीत रंगभूमीला पुनश्च वैभवाचे दिवस येणे अवघड नाही.

आज मराठी रंगभूमी सर्वार्गानी बहरलेली आहे असं म्हटलं जातं. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध रंगभूमींवर नवनवे प्रयोग चालू आहेत. परंतु संगीत रंगभूमीची मात्र पीछेहाट झालेली दिसते. किंबहुना, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. सध्या संगीत नाटकांचे तुरळक प्रयोग होत असतात आणि नाटय़संगीतही मागे पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे रसिकांच्या मनात- संगीत नाटके आणि नाटय़संगीत कालबाह्य़ झाले की कुवतबाह्य़ झाले आहे, असा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा ऊहापोह करण्याआधी संगीत नाटक आजच्या अवनत स्थितीला का व कसं पोहोचलं, याचा विचार करणे आवश्यक आहे.

१८८० साली अण्णासाहेब किलरेस्करांचं ‘संगीत शाकुंतल’ नाटक रंगभूमीवर आलं, तेव्हापासून खऱ्या अर्थाने संगीत नाटकांचा जमाना सुरू झाला. कीर्तनकार एखादं चरित्र/आख्यान सांगताना वीररसात्मक, करुणरसात्मक वगैरे विविध रसांची गाणी प्रसंगाला अनुरूप अशा रागांत गातो. ही गाणी साकी, दिंडी, कामदा, अंजनीगीत, कटाव वगैरे विविध वृत्तांत असतात. ‘शाकुंतल’ आणि त्यानंतर १९१० पर्यंत आलेल्या ‘सौभद्र’, ‘शापसंभ्रम’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’ वगैरे नाटकांत पुष्कळशी गाणी याच वृत्तात रचली गेली आहेत.

त्याकाळी संगीत नाटकं चालू असताना गद्य नाटकंही जोरात सुरू होती. असं असतानाही तेव्हा नाटकात गाण्यांचा समावेश करण्याची आवश्यकता त्यावेळच्या नाटकवाल्यांना भासली, याचं कारण चार-पाच तास गद्य नाटक पाहणं कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. म्हणून संगीत नाटकात पात्रांचं संभाषण, विचार, मनोगत वगैरे गाण्यांच्या रूपात व्यक्त केले गेले. ही गाणी केवळ मनोरंजनासाठीच होती असं नाही, तर कित्येक वेळा भावभावनांची उत्कटता व्यक्त करायला कधी कधी गद्य कमी पडते, तिथे संगीताचा वापर केल्यानं ती परिणामकारकरीत्या व्यक्त करता येते.

१९१० पर्यंत आलेल्या संगीत नाटकांमध्ये गद्य आणि संगीत समांतर रेषेत चालत होते. संगीत गद्याला पूरक होतं, त्यावर कुरघोडी करत नव्हतं. असा एक आक्षेप घेतला जातो की, जुन्या नाटकांत खूपच- म्हणजे दीडशे-दोनशे गाणी आहेत; म्हणजे फारच झालं! पूर्वीच्या काळी पाच-साडेपाच तास चालणारी, विस्तारानं लिहिलेली नाटकं होती. नाटकांतले बरेचसे संवाद, विचार, भावभावना संगीताच्या रूपात आल्याकारणानं गाण्यांची संख्याही जास्त होती. तरीही त्यांत गायन मर्यादित स्वरूपाचं होतं आणि ते संभाषण, विचार किंवा भावभावना व्यक्त करण्यापुरतंच होतं.

१९११ ते १९३३ हा काळ नाटय़संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशांसारख्या असामान्य गायकांनी दिलेल्या अभिजात संगीतातील उत्तमोत्तम चिजांवर आणि चालींवर गाणी बांधली गेली. ही नाटकं रंगभूमीवर येईपर्यंत शास्त्रीय संगीत फक्त विशिष्ट ठिकाणी थोडय़ाच लोकांना ऐकायला मिळत असे. तिथं सामान्यजनांना शिरकाव नव्हता. परंतु संगीत नाटकांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत नाटय़संगीताच्या रूपात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सामान्यजनांपर्यंत पोहचलं. मराठी प्रेक्षक नाटय़संगीतावर लुब्ध झाले आणि संगीत नाटकांवर अक्षरश: तुटून पडले. केशवराव भोसले, बालगंधर्व, मा. दीनानाथ, बापूसाहेब पेंढारकर असे मातब्बर गायक नट रंगभूमीला लाभले आणि त्यांनी नाटय़संगीतात क्रांती करून ते हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवलं.

या काळात नाटकांमधील गाण्यांची संख्या तुलनेनं कमी झाली; परंतु गायन अमर्याद झाले. संगीताच्या अतिरेकामुळे रंगभूमीची जी हानी झाली, त्यावर सुप्रसिद्ध नाटय़समीक्षक बाबुराव जोशींनी अशी मल्लीनाथी केली आहे की, ‘संगीताने प्रथमत: रंगभूमी गाजली खरी; परंतु तीच रंगभूमी अमर्याद संगीतामुळे नंतर गांजली.’ पु. ल. देशपांडे यासंदर्भात म्हणाले की, ‘शिरा तोच, पण सत्यनारायणाचा प्रसाद होऊन आल्यावर आपण द्रोणभरच देतो. तिथं काही बश्या भरभरून शिरा मिळावा अशी अपेक्षा नसते. सत्यनारायणाच्या शिऱ्यावर आडवा हात मारायचा नसतो. कारण पदार्थ तोच असला तरी त्याची भूमिका निराळी असते. रंगभूमीवरील या काळातल्या गाणाऱ्या नटांनी हे तारतम्य पाळलं नाही.’

संगीताचा अतिरेक केल्याचा परिणाम असा झाला की, त्यातलं नाटक आणि अभिनय दोन्हीही आक्रसून गेले. नाटक पाहून आल्यावर ‘नाटक आणि अभिनय चांगला झाला,’ असं म्हणण्याऐवजी ‘बालगंधर्व काय विलक्षण गायले!’ आणि ‘दीनानाथराव काय आक्रमक गायले!’ असे उद्गार प्रेक्षक काढू लागले. म्हणजे नाटक पाहायला जायचं ते गाणं ऐकण्यासाठी; त्यातील नाटय़ किंवा अभिनय पाहण्यासाठी नव्हे, असं व्हायला लागलं.

मामा वरेरकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, ‘सुरुवातीच्या काळात बालगंधर्व अभिनयापुरतं किंवा नाटय़ाला पोषक असंच गात असत. परंतु सवाई गंधर्व रंगभूमीवर फार गायला लागल्यामुळे बालगंधर्वानीही आपलं गाणं वाढवलं. बरं, त्यांचं गाणं काय कमी प्रतीचं होतं? मुळीच नाही. बालगंधर्व तर असं विलक्षण गात, की त्यांचं स्वर्गीय गायन ऐकायला अल्लादिया खाँसाहेबांसारखे गायक नाटकाला येऊन बसत असत. नंतरच्या काळात छोटा गंधर्व सोडून असे गायक निर्माण झालेच नाहीत.’

पुढच्या काळात रंगभूमीवरील पुष्कळसे गायक बालगंधर्व किंवा मा. दीनानाथ यांच्या गायकीचं अनुकरण करू लागले. परंतु बरेचसे गायक त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याऐवजी त्यांच्या दोषांचं अनुकरण करून आपण बालगंधर्व वा दीनानाथरावांची गायकी गातो, असा टेंभा मिरवायला लागले. परिणामत: संगीताचं (नाटय़संगीताचं) अक्षरश: डबकं झालं. गायनकलेची वृद्धी आणि उत्कर्ष व्हायचा असेल तर ती वाहती असायला हवी. नवनवीन स्रोत, नवीन विचार, नवीन ओघ त्यात मिसळले पाहिजेत. तसं झालं नाही. त्यामुळे नाटय़संगीताचा खळाळता प्रवाह अडून बसला.

१९४२ नंतर ‘कुलवधू’ वगैरे नाटय़निकेतनच्या नाटकांत ज्योत्स्नाबाई भोळ्यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीतगायन करून आणि नंतर छोटा गंधर्वानी आपल्या वेगळ्या गायकीनं नाटय़संगीताचा अडलेला हा प्रवाह बराचसा मोकळा केला. पण खऱ्या अर्थानं नाटकाला छेद न देता नाटकांबरोबर समांतर जाणारं नाटय़संगीत निर्माण केलं ते १९६० साली आलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ने! त्यानंतर १९६० ते १९८५ या काळात आलेल्या नाटकांत वसंतराव देसाई, छोटा गंधर्व, राम मराठे, नीळकंठ अभ्यंकर, प्रभाकर भालेकर वगैरे संगीतकारांनी फार चांगल्या चाली दिल्या.

१९६४ नंतर कल्पक व शास्त्रीय संगीतावर आधारित चाली देऊन नाटय़संगीताला प्रवाही आणि खळाळतं स्वरूप दिलं ते पं. जितेंद्र अभिषेकी यांनी! अभिजात संगीतावर आधारलेल्या चाली तर त्यांनी दिल्याच; परंतु ‘लेकुरे उदंड जाली’- ज्याला ‘संगीतक’ म्हणता येईल अशा हलक्याफुलक्या आणि ‘संत गोरा कुंभार’सारख्या भक्तिरसप्रधान नाटकाला चाली लावून आपण र्सवकष रचना करू शकतो हे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले.

पुन्हा १९८५ नंतर संगीत नाटकांचा आणि नाटय़संगीताचा अंधार सुरू झाला. त्यामुळे बरेचसे शंकेखोर लोक शंकाकुल होऊन ‘नाटय़संगीत कालबाह्य़ झालं आहे का? ते कुवतबाह्य़ झालं आहे!,’ अशी विचारणा करू लागले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तसं काही झालेलं नाही. पं. भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव यांनी नाटय़संगीताच्या लावलेल्या रोपाचा केशवराव भोसले, बालगंधर्व, दीनानाथराव, बापूसाहेब पेंढारकर यांच्या उत्कृष्ट गायनामुळं वटवृक्ष झाला आणि त्या वटवृक्षाची पाळेमुळे मराठी मनाच्या गाभाऱ्यात खोलवर गेली आहेत. नाटय़संगीत मराठी माणसाच्या जीवनात एवढं खोलवर रुजलं आहे, की ते महाराष्ट्रातून हद्दपार होणं शक्य नाही.

मात्र, मर्मबंधात वसलेली ही संगीत रंगभूमी पुन्हा उजळवून टाकायची असेल तर त्यासाठी काही ठोस उपाय योजण्याची गरज आहे. आज संगीत रंगभूमीवर जी थोडीफार नाटके अस्तित्वात आहेत, ती पाहायला प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत असतात. परंतु संगीत नाटकांकडे तरुण प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्याचे ईप्सित साध्य होण्यावर या रंगभूमीचे भवितव्य अवलंबून आहे. संगीत नाटकांकडे तरुण प्रेक्षकांना आकर्षित करून घ्यायचे असेल तर सध्याच्या रंगभूमीचे जुने स्वरूप नाहीसे करून तिला नवे रूप द्यायला हवे. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’, ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’ इ. लोकप्रिय संगीत नाटकांच्या गुणवत्तेचे नव्याने दर्शन घडवायला हवे. सर्वप्रथम या नाटकांच्या संहिता संपादित करून त्या नेटक्या आणि प्रयोगशील करायला हव्यात. त्याचप्रमाणे गाणीही मोजकीच घ्यायला हवीत. तरुण गायक अभिनेत्यांना प्राधान्य देऊन प्रयोगाचे सादरीकरणही नावीन्यपूर्ण करायला हवे.

संगीत नाटक थंडावण्याचे प्रमुख कारण म्हणजे नव्या संगीत नाटकांच्या संहितांचा अभाव हे आहे. नवी संगीत नाटकं केली जात नाहीत; कारण मुळात ती लिहिलीच जात नाहीत. आणि ती लिहिली जात नाहीत, म्हणून ती केली जात नाहीत, असं हे दुष्टचक्र आहे. विद्याधर गोखले यांच्यानंतर सातत्याने संगीत नाटके लिहिणारा नाटककार मराठी रंगभूमीला लाभला नाही. यासाठी संगीत नाटय़लेखनाच्या कार्यशाळा भरवून नवीन किंवा प्रचलित लेखकांना संगीत नाटकं लिहिण्यास प्रवृत्त करायला हवे.

संगीत नाटकांत संगीत कशा प्रकारचं असावं? अभिजात वा शास्त्रीय संगीतावर आधारलेलं असलं तर फारच उत्तम! फरक एवढाच, की शास्त्रीय संगीतावर आधारीत आहे म्हणून फार वेळ गाऊन किंवा ताना मारून चालणार नाही. भाव आणि रसोत्पत्ती साधेपर्यंतच; पण कसदार गायन असावं. सर्वच गायक-गायिकांना शास्त्रीय संगीतात गाणं म्हणणं जमणार नाही यास्तव सुगम संगीताचा वापर करायला हवा. सुगम संगीतात अभिप्रेत आहे ते भावगीत, लावणी, दिंडी, कामदा, लोकसंगीत वगैरे गायनप्रकार!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीत नाटक हे आनंदाचे आणि सुगंधाचे सुखनिधान असायला हवे. प्रसन्नतेने आनंदाचा शोध घेणे हे संगीत नाटकाचे अंतिम ध्येय झाले तर संगीत नाटक निखळ व स्वच्छ करमणूक देऊ शकेल आणि प्रेक्षकांची रंजकतेची, अभिरुचीची प्रतिष्ठित भूकही भागवू शकेल.

- रामदास कामत (लोकरंग, ६ नोव्हेंबर २०११)

12 June, 2011

मराठी नाट्यसंगीत - केशवराव भोसले

केशवराव भोसले - मराठी संगीत नाट्यरंगभूमीवरील एक अतिशय गुणी नट आणि उत्तम गायक. आपल्या क्षेत्रात पुढे जाताना दुसऱ्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाणे, आपल्याकडे नसलेली कला दुसऱ्यांकडून विनयाने आत्मसात करणे आणि असलेली कला दुसऱ्यांना देणे असे हे व्यक्तिमत्व होते.

केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सदर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला. वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. उदा - संगीत सौभद्र मधील तुळशी वृंदावन, फिडेल वाद्याचा उपयोग इ.

केशवराव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. ह्या नाटकाची तिकिटे १०० रु. ह्या दराने विकली गेली होती (१०० रु. हि त्यावेळची फार मोठी किंमत होती).

मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार ह्या नाटकातील केशवरावांची डेविडची भूमिका अविस्मरणीय आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. हा त्या नाटकाचा पहिला उघड्या रंगभूमीवरील प्रयोग होता.

संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. त्या आधी म्हणजे १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला होता. त्याप्रसंगी पंडित विष्णू दिगंबर पळूस्कर यांनी केशवरावांच्या गायन शैलीवर भाषण केले होते.

१९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. ४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह उघडले गेले.

15 April, 2011

मराठी नाट्यसंगीत - गोविंदराव सदाशिव टेंबे

गोविंदराव टेंबे - मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातील एक उत्कृष्ठ कलाकार, संगीतकार आणि महाराष्ट्राच्या संगीत इतिहासातील सर्वोत्कृष्ठ पेटी-वादक. चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. नारायण सीताराम फडक्यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले. बालगंधर्व तर त्यांना गुरु मानायचे.

गोविंदरावांचा जन्म ५ जून १८८१ साली कोल्हापूर येथे झाला. अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देतात. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत.

गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोगहि करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. तसेच त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले.

१९१३ मध्ये प्रस्थापित झालेल्या गंधर्व नाटक मंडळीचे गोविंदराव काही टक्क्यांचे मालक होते. पुढे २ वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली.

९ ऑक्टोबर, १९५५ रोजी गोविंदराव वारले. जाताना त्यांनी मागे ग्रामोफोनच्या ७८ आर.पी.एम. च्या ३० रेकॉर्ड्स ठेवल्या आहेत. त्यात त्यांचे स्वतंत्र पेटी-वादन, त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत. गोविंदरावांनी प्रचंड लिखाणसुद्धा केले आहे. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.

गोविंदराव टेंबे यांच्या पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साईट पहावी.