21 March, 2013

स्वरसम्राज्ञी

संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी सांगितलेली त्यांची संगीत कहाणी!


'नरवर कृष्णासमान' या पदाच्या वेळची रुक्मिणीची भावावस्था! कृष्णानं रुक्मिणीला 'गुरु'पद दिलं आहे, आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.. प्रियकराच्या प्रेमाचा साक्षात्कार होताच रुक्मिणी जणू बेभान झाली आहे. घराण्याची खानदानी बंधनं झुगारून ती कृष्णावरचं आपलं प्रेम व्यक्त करते आहे.. याच्या सारखा हाच 'नरवर कृष्णासमान'; केशवसुतांचं ..'काठोकाठ भरू द्या पेला । फेस भराभर उसळू द्या!' ची आठवण होते. आनंदाची उधळण अशीच असायला हवी! तो उन्मुक्त मोकळेपणा स्वरातून, भावातून, आविर्भावातून व्यक्त करताना मला जे समाधान मिळालं नेमका तोच समाधानाचा हुंकार रसिकांच्या प्रतिसादातून मिळत असे.'' 'सौभद्र', 'स्वयंवर',' शारदा','स्वरसम्राज्ञी' आदी अनेक नाटकांतल्या भूमिका अजरामर करणाऱ्या, संगीत नाटकालाच आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी सांगितलेली त्यांची संगीत कहाणी!

संगीत आणि संगीत नाटकं याचं आणि माझं नातं माझ्या जन्माआधीपासूनच जुळून गेलंय. आईच्या पोटात मी होते तेव्हा खरं तर विश्रांतीसाठी ती नानांच्या बरोबर भारत नाटक मंडळीच्या बिऱ्हाडी गेली होती. मंडळींचा सावंतवाडीला दोन महिने मुक्काम होता. त्याच दरम्यान अचानक प्रमुख नायिका कोर्टाच्या कामानिमित्त पुण्याला गेली आणि लोकाग्रहास्तव 'सौभद्र' नाटकातील सुभद्रेची भूमिका आईला करावी लागली होती! पण खऱ्या अर्थानं माझं रंगमंचावर पहिलं पाऊल पडलं ते वयाच्या दहाव्या वर्षी 'सौभद्र' तील नारदाच्या भूमिकेनं. त्यानंतर थोडय़ाच काळात 'सौभद्र'चा पूर्ण प्रयोग लता (बहीण) मी आणि चुलतभाऊ सुरेश.. अशा तीन शिलेदारांनी साकारला. त्याचं असं झालं.. बिऱ्हाडी स्वरूपाची 'मराठी' रंगभूमी ही संस्था १९५८ साली बंद झाली आणि मुलींच्या शिक्षणासाठी नाना, आई (जयराम आणि जयमाला शिलेदार) पुण्यात स्थायिक झाले. मराठी रंगभूमीचं काम नाइट पद्धतीनं सुरू झालं. नाना-आईंची नाटकं बघता बघता नाटकातले संवाद आणि पदं आम्हा मुलांना पाठ होऊन जात. नंतर नाटकातल्या चुका, विसंगती आम्हा मुलांच्या लक्षात येऊ लागल्या.. घरी आल्यावर त्यांच्या नकला, विडंबनं करण्यात आम्ही रमून जायचो. त्या नकला तालासुरात असल्यामुळं नाना समजून चुकले की मुलं संगीत नाटकानं भारून गेली आहेत.. त्यांच्यात काही विशेष आहे! आमच्यातल्या कलागुणांना आकार देण्यासाठी त्यांनी आमच्यासमोर 'सौभद्र' नाटकाचं आव्हान ठेवलं. लताचा गळा चांगला फिरत असल्यानं महत्त्वाच्या भूमिका तिला दिल्या गेल्या. माझा गळा.. तान अजिबात फिरत नसे! पण सूरताल ठिकठाक! आईनं पदं बसवून घेतली. तिचं कौशल्य असं, की आवाजाच्या नैसर्गिक धाटणीला धक्का न लावता तिनं बेहेलाव्यानी पद रंगवण्याची पद्धत अंगीकारली.


या सुमारास रा. ना. पवारलिखित 'कविराय राम जोशी' नाटकाचे प्रयोग जोरात सुरू होते. त्यात सवाल-जबाबाच्या सीनला पडद्याच्या आतून झील देण्यासाठी आम्ही मुली उत्साहानं तयार असायचो. नानांच्या चढय़ा आवाजाला वरच्या पंचमापर्यंत जाऊन 'जी जी' म्हणताना मला स्फुरण चढत असे! त्यातूनच हिची पट्टी इतर मुलींहून चढी असावी असा अंदाज आईला आला. 'शारदा' नाटक बसवलं जात होतं. कोणत्या पट्टीत कीर्तीचा आवाज सहज फिरेल याची चाचपणी करताना काळी एक पट्टी योग्य वाटली. 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाच्या वेळी माझी पट्टी सापडली. धिमी लय, स्वराचे आर्त लगाव, िमड जपत, आस जपत पद साकारणं.. अशा बारकाव्यानिशी आईनं ते पद शिकवलं. शारदेची भूमिका करताना हे पद म्हणजे जणू मला शारदेचा दबलेला आक्रोशच वाटे. शारदेवर ओढवलेला प्रसंग, वडिलांचा जुलमी जाच, मैत्रिणींची जीवघेणी थट्टा.. आजोबा शोभेल अशा वयाच्या माणसासमोर वधू-परीक्षेला जाण्याचा दारुण अनुभव.. या साऱ्यांचा माझ्यावर परिणाम होत असे. हे पद म्हणताना गळा कातर होत असे.. डोळ्यांतून कारुण्य ओसंडू लागे. त्याच वेळी भावनांवर आवर घालून पद साकारणं ही मोठी कसोटी वाटत असे.. पण थोडय़ा वेळातच स्थिरता येऊन पद साकारता येई. हा एक विलक्षण अनुभव असे. लताजवळ आमचे थोर नाटय़गुरू मा. दत्तारामबापूंनी माझ्या अपरोक्ष दिलेली शाबासकी आठवली की मन भरून येतं. 'कीर्ती शारदेचं काम समजून करते!'


'रंगात रंगला श्रीरंग','ययाति आणि देवयानी' अशा नाटकांतून उमेदवारी करत असताना मला 'स्वयंवर' नाटकातल्या रुक्मिणीचं आकर्षण वाटू लागलं. आई अनेक विद्यार्थिनींना नाटय़संगीत शिकवत असे. त्यावेळेस ठेका धरायला मीच बसत असे. ऐकून ऐकून माझी 'स्वयंवर'मधील गाणी बसून गेली.. आणि मी नानांजवळ 'रुक्मिणी'च्या भूमिकेचा हट्ट केला! नाना म्हणाले, ''आधी पदं म्हणून दाखव मग विचार करू.'' अर्थातच मी सगळी महत्त्वाची पदं तालासुरात म्हणून दाखवली. नानांना विश्वास वाटला. पुन्हा नव्यानं आईपुढं बसून पदांची तालीम सुरू केली. गद्य भाग बसवण्यासाठी मला वसईला दत्तारामबापूंचं मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवलं गेलं. त्यांनी संवादफेक आणि रुक्मिणीचा खानदानी रुबाब, तिचा आई, वडील, भाऊ आणि प्रियकर कृष्णाबरोबर होणारा संवाद, तिचं आत्मकथन या सर्वाची चांगली जाणीव देऊन रुक्मिणी समजावून सांगितली. आमच्या मराठीचे प्राध्यापक वि. वि. पटवर्धनसरांनी अवघड गद्य व पदांचे अर्थ समजावून सांगितले. 'स्वयंवर' नाटकावरील लिखाण, टीका त्यांनी मला वाचायला लावल्या. आईनं साकारलेल्या रुक्मिणीपेक्षा माझी 'रुक्मिणी' वेगळी होत होती.. नाना-आईंना तेच अपेक्षित होतं. प्रत्येक भूमिकेचा वेगळा अभ्यास करायला त्यांनी पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं होतं. 'स्वयंवर'मधील पदं म्हणताना मला खूप आनंद वाटे. साथीला चंद्रशेखर, संजय हे देशपांडे बंधू असत. व्हायोलिनला बबनराव गोखले, ए. पी. फाटक, तर तबल्यासाठी विनायकराव थोरात! पदं साकारताना मी माझी एक वेगळी शैली तयार केली. उदाहरणार्थ 'नरवर कृष्णासमान' या पदाच्या वेळची रुक्मिणीची भावावस्था! कृष्णानं रुक्मिणीला 'गुरु'पद दिलं आहे, तिचं पाणिग्रहण करण्याचं वचन दिलं आहे, आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.. प्रियकराच्या प्रेमाचा साक्षात्कार होताच रुक्मिणी जणू बेभान झाली आहे. घराण्याची, जबाबदारीची खानदानी बंधनं झुगारून ती कृष्णावरचं आपलं प्रेम व्यक्त करते आहे.. याच्यासारखा फक्त हाच 'नरवर कृष्णासमान'; केशवसुतांची कविता आठवली, 'काठोकाठ भरू द्या पेला । फेस भराभर उसळू द्या!' आनंदाची उधळण अशीच असायला हवी! तो उन्मुक्त मोकळेपणा स्वरातून, भावातून, आविर्भावातून व्यक्त करताना मला जे समाधान मिळालं नेमका तोच समाधानाचा हुंकार रसिकांच्या प्रतिसादातून मिळत असे. पद अभिव्यक्त करण्याची माझी नवी कल्पना रसिकांनी उचलून धरली. त्या वेळी सादर होणाऱ्या संगीत नाटकातील बरेचसे कलाकार नाटकातून पदं गाताना गायकीवर अधिक लक्ष केंद्रित करत असत. कैकदा भूमिकेतून अलिप्त होऊन ही गायकी प्रकट होत असे.. अर्थात त्यावेळचा रसिकवर्ग नाटय़वेडापेक्षा संगीतवेडा अधिक होता.. त्यामुळं ती संगीत नाटकंही लोकप्रियतेत कुठंही कमी नव्हती. रुक्मिणीच्या भूमिकेत मी, कृष्णाच्या भूमिकेत विश्वनाथ बागूल आणि भीष्मक- महाराणीच्या भूमिकेत नाना, आई! अशा यथोचित पात्रयोजनेमुळं, नावीन्यामुळं, ताजेपणाच्या स्पर्शानं 'स्वयंवर' टवटवीत झालं आणि रसिकांच्या पसंतीला उतरलं.


त्यानंतर शारदा, सुभद्रा, रेवती, भामिनी, वसंतसेना, शकुंतला, मंथरा, सिंधू, द्रौपदी, देवयानी, कान्होपात्रा अशा बालगंधर्वानी रंगवलेल्या बारा नायिका करण्याची संधी मला मिळाली. मी त्या सर्व भूमिकांच्या प्रेमात पडले.. अभ्यासानं मी त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वात भिनवून घेतलं.. आणि प्रत्येकवेळी त्या साकारताना मला अपरंपार आनंद झाला! संगीत नाटकांनी वेगवेगळ्या प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या नवरसप्रधान अभिनयाची केलेली ही उधळण त्या नायिकांमधून मला मिळत गेली. संगीत नाटकांचं हे ऋण कसं बरं फिटणार?

बारा, जुन्या संगीत नाटकांबरोबर आमच्या 'मराठी' रंगभूमीनं पंचवीस नवी संगीत नाटकं रंगभूमीवर आणली. जुन्या नाटकांइतकी लोकप्रियता नव्या संगीत नाटकांना सहजासहजी लाभत नाही. खूप अपयश पचवल्यावर 'स्वरसम्राज्ञी'सारखं एक यश परमेश्वरानं आमच्या पदरात टाकलं. १९७२ साली विद्याधर गोखलेंनी 'पिग्मॅलियन', 'माय फेअर लेडी'च्या विषयावर आधारित 'स्वरसम्राज्ञी' नाटक लिहिलं. भारतीय वातावरणात ते कथानक जुळवून घेताना नायिकेचा सुरवंटातून फुलपाखरू बनण्याचा प्रवास भाषेपेक्षा संगीतामध्ये जास्त खुलत होता हे लक्षात घेऊन त्यांनी, 'नायक गंगाधर एका तमाशातील लावणी गायिकेला शास्त्रीय संगीताची गायिका बनवण्याचे स्वप्न सत्यात आणतो' असा आराखडा रेखला. ते कथानक आम्हा सर्वाना फारच आवडलं. या नाटकामुळं पं. नीलकंठ अभ्यंकरांसारख्या महान संगीतकाराची ओळख झाली. गंधर्वभक्त असल्यामुळं नाना, आई आणि अभ्यंकर बुवांचे विचार एकदम जुळले. बुवांची ओळख होण्याआधी मी 'स्वरसम्राज्ञी'तल्या मैनेसारखीच शास्त्रीय संगीतापासून पळ काढणारी होते. पण बुवांनी शास्त्रीय संगीताच्या मंदिराचं द्वार असं काही खुलं केलं की या अपार आनंदापासून इतके दिवस आपण दूर का राहिलो याचा पश्चात्ताप वाटू लागला. अर्थातच मी आणि लता तेव्हापासून बुवांकडं शास्त्रीय संगीत शिकू लागलो. 'स्वरसम्राज्ञी' नाटकाच्या निमित्तानं बुवांनी खूप काही नवे विचार दिले. भावना परिपोषासाठी श्वासाचाही कसा उपयोग होऊ शकतो.. बोलीभाषेत लघुगुरू सांभाळून जसे उच्चार केले जातात, तसे पद गातानाही केले पाहिजेत, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. गळा फिरेल तसे न गाता, आपल्या मनात जसा स्वरबंध असेल तसाच गळा फिरायला हवा.. अर्थात गळ्यावर आपल्या बुद्धीची हुकमत असली पाहिजे. गाण्याचा जो प्रकार आपण गाणार असू तो त्या ढंगातच गायला गेला पाहिजे. हे सगळं दिसायला सोपं वाटत असलं तरी अंगीकारायला फारच कठीण होतं. पण बुवा स्वत: गाऊन त्याचा प्रत्यय देत असत. 

'स्वरसम्राज्ञी' नाटकातील सगळी गाणी अतिशय उत्तम बांधली गेली आहेत. नायिका मैनेसाठी बैठकीची लावणी, ठुमरी, शास्त्रीय चीजा, छक्कड लावणी, भावगीत, गझल असे वेगवेगळे प्रकार योजले गेले. अभ्यंकर बुवांनी संगीत सहायक म्हणून बावीस र्वष सी. रामचंद्रांसारख्या प्रतिभाशाली संगीतकाराबरोबर काम केलं होतं. त्या अनुभवांचा फायदा 'स्वरसम्राज्ञी'च्या संगीत रचनांना मिळाला! कथानकात रस परिपोष साधण्यासाठी त्यातील नाटय़ नेमकं टिपून ते तालासुरात झेलण्याची तरलता बुवांपाशी होती. पदातल्या शब्दांवर कवीइतकंच प्रेम करणारे बुवा शब्दोच्चारणातली लहानशी चूकही खपवून घेत नसत. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या 'अभोगी' नाटकातल्या एका पदात तारसप्तकातल्या षड्जापासून वर मध्यमापर्यंत आकारात एक िमड घ्यायची होती.. ती अवघड जात होती.. आवाजावर कमालीचं नियंत्रण ठेवून ती जागा घेताना वरचा मध्यम जरा कमी-जास्त झाला तर बुवा एकदम संतापत होते. ''कोणतीही सबब चालणार नाही.. शेंडी तुटो की पारंबी.. वरचा मध्यम स्वरात लागलाच पाहिजे!'' कोणतीही गोष्ट करायची झाली तर जीव घालूनच केली पाहिजे, अशी ती शिकवण होती.

शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात झाल्यावर आकाशवाणीवर ऑडिशन होऊन शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत कलाकार म्हणून अनेक संधी मिळाल्या. अनेक चेनबुकिंग, दोन वेळा अखिल भारतीय मंगळवारीय संगीत सभेत गाण्याचा मान मिळाला. पूर्वी बुधवारी सकाळी प्रत्यक्ष प्रसारणासाठी सकाळचा राग गावा लागत असे. एकदा पतंजली मादुसकरांनी त्या कार्यक्रमासाठी बोलावलं.. त्यावेळी बुवांनी मला शिकवलेली, रत्नकांत रामनाथकारांनी 'देसी' रागात बांधलेली, रूपक तालातील चीज मी गायले होते. ती ऐकून संगीतज्ञ वामनराव देशपांडय़ांनी मुद्दाम फोन करून मला शाबासकी दिली होती. शास्त्रीय संगीताबरोबरच बुवांनी मला काही हिंदी, गुजराथी रचना, भजने, भावगीतं शिकवली होती. भूज, राजकोट, अहमदाबादच्या चेनबुकिंगमध्ये त्या गुजराथी भजनांना खूप दाद मिळाली. बुवांमुळे अनेक गुणिजनांशी परिचय झाला. पं. भाई गायतोंडे, विश्वनाथ पेंढारकर, सुधीर संसारे, केशवराव चाफेकर, गणादादा पुराणिक, दादा आपटे, शांताबाई आपटे.. आम्ही सगळे एकत्र येऊन खाणं, गाणं, गप्पा गोष्टी करत असू.. फार चांगले दिवस होते ते.. त्यातूनच त्रिवेंद्रमची सफर आयोजित झाली. केशवराव चाफेकरांनी त्यांच्या जावयांकडे.. थोर शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव आणि सुधाताईंकडे आम्हा सर्वाना पाहुणचारासाठी नेलं. फार सुंदर सहल झाली. डॉक्टरसाहेबांनी रॉकेट लाँचिंगचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्या मुक्कामात त्यांनी 'शंकराभरणम्' चित्रपट पाहण्याचा आग्रह केला. संगीतावर आधारित असलेला तो चित्रपट आम्हा सगळ्यांना खूप आवडला. त्यातील 'शंकराभरणम्' गाण्यानं मला वेडं केलं. हे आपल्याला यायला हवं असा ध्यास लागला. त्या गाण्याचं रेकॉर्डिग मिळवून.. सारखं गुणगुणून मी ते आत्मसात केलं. नगरच्या एका मैफलीत मी बेधडक ते गाऊन पाहिलं. त्याला फार छान दाद मिळाली. मग एका तेलुगू गृहस्थांकडून मी शुद्ध तेलुगू उच्चार आणि गाण्याचा अर्थ समजावून घेतला. ललित कलादर्शच्या अमृत महोत्सवाचा सोहळा हुबळीला झाला होता. पुण्या-मुंबईतले झाडून सगळे कलाकार त्यात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात मी आवर्जून 'शंकराभरणम्' गायले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या सोहोळ्यात 'शंकराभरणम्'नं खास छाप उमटवला. वन्समोअरचा गडगडाट, थोर लेखक रणजित देसाईंनी उभं राहून पुन्हा गाण्याची केलेली विनंती.. 'पुन्हा शंकराभरणम्' आणि टाळ्यांचा कडकडाट! तो क्षण मला मोरपिसासारखा वाटतो!

आंध्रच्या चेनबुकिंगमध्ये असाच एक आगळा अनुभव मला आला. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या कलाकारांचं नाटय़संगीत हैदराबाद, विशाखापट्टणम्, विजयवाडा,कडाप्पा या शहरात आयोजित होतं. प्रवासात तेलुगू आणि मराठी कलाकारांची छान ओळख झाली. त्यातून देवाणघेवाण होऊन तेलुगूकृष्ण पृथ्वीरामारावना आईनं 'राधाधर मधुमििलद' हे पद शिकवलं, तर पृथ्वीनं मला गंधर्वभक्त रघुरामय्यांचं तेलुगू भजन 'रामनील मेघस्यामा' शिकवलं. मी ते सारखं गुणगुणत होते. तेलुगू दुर्योधन अच्युत वेंकट रत्नम्नं मला विजयवाडय़ाच्या कार्यक्रमात ते पद गाण्याची विनंती केली. मी गायले. त्याला रसिकांची दाद तर मिळालीच; पण एक वेगळी गोष्ट अशी झाली.. त्या कार्यक्रमाला दिवंगत रघुरामय्यांच्या पत्नी आल्या होत्या.. त्यांना गहिवरून आलं.. त्या म्हणाल्या,''मुली, हा काय योगायोग आहे? काही वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडय़ांच्या आग्रहावरून माझे पती पुण्याला गेले होते.. त्यांनी तिथं बालगंधर्वाचं एक मराठी पद 'मूर्तिमंत भीती उभी' म्हटलं होतं.. त्याच पुण्यातून एक मुलगी विजयवाडय़ाला येते आणि माझ्या नवऱ्याचं तेलुगू भजन म्हणते!'' हा संगीत योग खरंच अविस्मरणीय होता.

केवळ गंभीर, करुण आणि शृंगार रसावर आधारित पदांनाच लोकप्रियता लाभते असा समज असतो. चंचल गाण्यांनाही छान दाद मिळू शकते हे मला 'रेवती'च्या 'हृदयी धरा हा बोध खरा' या पदामुळं कळलं. अर्थात वेगळं करून बघण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे मला हे बक्षीस मिळालं होतं! 'रेवती' अल्लड आणि थट्टेखोर आहे या वाक्याचं 'इंप्रोवायझेशन' मी 'हृदयी धरा' या पदात करून पाहिलं. त्यात माझ्या नकल्या स्वभावाची मदत मिळाली. भजन प्रकाराची सुरुवात मी 'हृदयी धरा' इतकंच म्हणून शंृगारिक ठुमरीच्या आविर्भावात केली. 'अश्विन शेट'ला खुलवून शेवटी थंड पाणी ओतल्यासारखं 'हा बोध खरा' असं भजन सुरू केलं. रेवतीचा सगळा खटय़ाळपणा त्या पदात खळाळत राहिला.. गाण्यातून अश्विनशेटची उडवलेली टर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. कोल्हापूरच्या एका आजींनी आपल्या हातातली सोन्याची बांगडी मला त्या अदाकारीसाठी बक्षीस दिली!

'कान्होपात्रा' नाटकातल्या कान्होपात्राच्या भूमिकेनं मला परमेश्वर सान्निध्याचा आध्यात्मिक अनुभव मिळाला. मा. कृष्णरावांचं सुंदर संगीत, कान्होपात्रेच्या उत्कट काव्यरचना.. तिचा जीवन संघर्ष आणि परमेश्वरचरणावर तिचा होणारा देहान्त.. ही विलक्षण वेगळी गोष्ट होती. इथं टाळ वाजवून भजन म्हणण्याची मला हस्तगत झालेली कला उपयुक्त ठरली. 'अवघाचि संसार, अगा वैकुंठीच्या राया' ही पदं म्हणताना होणारा आनंद वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. स्वत:चा विसर पडण्याइतका खोल परिणाम जाणवतो. चांगला प्रयोग, जमलेली मैफल तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. दोन-तीन दिवस तुम्ही त्या सुंदर अनुभवात तरंगत राहता!

काही काळ मी पंढरपूरच्या प्रख्यात शंकरअप्पा मंगळवेढेकर यांच्याकडं मृदंगाचे धडे घेतले होते. पाठीच्या दुखण्यामुळं ती आवड मला जोपासता आली नाही. पण जेव्हा शिकत होते, त्याच सुमारास शंकर अप्पांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त कार्यक्रम योजले होते. त्यात त्यांनी मला मृदंगावर चौताल वाजवायला सांगितला! नुकतंच तलावात तीन फूट पाण्यात पोहायला शिकणाऱ्याला एकदम खोल पाण्यात पोहण्याची आज्ञा झाल्यावर त्या नवशिक्याचं जे काही होईल तसं माझं झालं. जे शिकले होते त्याची तालीम करून धीर एकवटून मी मृदंगवादनाला सुरुवात केली. एकदीडीच्या वजनाचा बोल वाजवायला सुरुवात केल्यानंतर जाणवलं, चुकून आपण तो बोल दुपटीच्या वजनात वाजवतो आहोत. अर्थातच लक्षात आलं.. हा बोल समेच्या खूप आधी संपणार आहे.. समोर बसलेल्या जाणकारांनाही ते लक्षात आलं होतं.. बोल संपला.. उरलेल्या जागेत काहीतरी वाजवायचं म्हणून मी 'तिटकत गदीगन धा'चा तिय्या वाजवला!.. खड्डय़ात कोसळणार याची खात्री असतानाच.. अवघड करामतीनंतर सुरेख लँिडग करणाऱ्या जिमनॅस्टसारखी मी डौलात समेवर पोहोचले होते! ती सुंदर सम माझी नसून ज्याच्या मंदिरात ते मृदंगवादन चाललं होतं त्या 'पांडुरंगा'ची होती!

आमचे नाना-आई प्रयोगाला 'खेळ' म्हणायचे. संगीत नाटकाचा खेळ त्या दोघांनी मन:पूर्वकपणं खेळला. आम्ही मुली त्याच वेडानं पछाडलो आहोत हे कळल्यावर आम्हाला परावृत्त न करता त्या खेळात आम्हालाही सहभागी करून घेतलं. 'संगीत नाटक', 'संगीत मैफल' या जिवंत कला आहेत. त्या प्रत्यक्ष घडल्या पाहिजेत तरच त्यांच्या चैतन्यानं कलाकार आणि रसिक तल्लीन होऊन आनंदात न्हाऊन निघतील. नाना, आई आणि अभ्यंकरबुवांनी मला घडवलं.. संगीताचा आणि नाटकाचा वसा प्राणपणानं कसा जपावा हे शिकवलं. संगीताचं माझ्या आयुष्यातलं स्थान श्वासोच्छवासासारखं आहे. नानांच्या निर्वाणानंतर आयुष्यात कसोटीचा काळ आला होता.. त्या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी हात दिला संगीतानंच!.. संवेदनाशील मनावर फुंकर घातली संगीतानंच आणि ताठ मानेनं जगण्याची प्रेरणा दिली संगीतानंच! आकाशवाणीवरच्या एका संगीत सभेत माझी ओळख करून देताना प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर म्हणाले होते, ''संगीत ही कीर्तीची मातृभाषाच आहे!''

चतुरंग (लोकसत्ता पुरवणी)
१६ मार्च २०१३
(http://www.loksatta.com/chaturang-news/interview-of-kirti-shiledar-82048/)